Bhandara News : घरात वडिलांचं पार्थिव, मनात आठवणींचे काहूर अन् डोळ्यात अश्रूंचा पूर; लाडक्या लेकीनं मोठ्या धैर्यानं दिली बारावीची परीक्षा
HSC Board Exam 2026: दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही धैर्यानं उभं राहणं कसं असतं, याचं जिवंत उदाहरण भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातनं समोर आलं आहे.

Bhandara News : "दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही धैर्यानं उभं राहणं कसं असतं, याचं जिवंत उदाहरण भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातनं समोर आलं आहे. एका बाजूला वडिलांचं पार्थिव घरात पडलेलं, नातेवाइकांचा आक्रोश..., पण दुसरीकडे आयुष्याचं वळण ठरवणारी बारावीची परीक्षा! (HSC Board Exam 2026) काळजावर दगड ठेवून एका लेकीनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट परीक्षा केंद्र गाठलं." हा प्रसंग घडला काल (10 फेब्रुवारी) बारावीच्या पहिल्या दिवशीच्या परीक्षेच्या (HSC Board Exam 2026) दिवशी भंडाऱ्याच्या तुमसर येथील परीक्षा केंद्रावर.
Bhandara News : मनात वडिलांच्या आठवणींचे काहूर, डोळ्यात अश्रूंचा पूर, पण वडिलांचा शब्द पाळला
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आंबागड येथील ही हृदयद्रावक घटना. सोमवारी दुपारी जान्हवीचे वडील हौशीलाल राहांगडाले यांचा अपघाती मृत्यू झाला आणि राहांगडाले कुटुंबावर आभाळ कोसळलं. घरात आक्रोश सुरू होता, घराचा आधारवड हरपला होता. मात्र, नियतीने आणखी एक कठीण परीक्षा समोर ठेवली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. मनात वडिलांच्या आठवणींचे काहूर माजले होते, डोळ्यांत अश्रूंचा पूर होता. पण जान्हवीला आठवत होतं ते वडिलांनी पाहिलेलं स्वप्न. "शिका आणि मोठी व्हा," हे वडिलांचे शब्द तिला स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी, वडिलांच्या पार्थिवाला घरात ठेवून, जड पावलांनी जान्हवी मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्रावर पोहोचली. आंबागड ते तुमसर असा 8 किलोमीटरचा प्रवास करून ती केंद्रावर आली. पेपर लिहिताना प्रत्येक शब्दामागे वडिलांचा चेहरा तिला दिसत होता. पेपर संपला, तिने घराकडे धाव घेतली आणि त्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जान्हवीच्या या जिद्दीपुढे आणि धैर्यापुढे सर्वचं नतमस्तक झालेत.
Mumbai Accident : 12 वीच्या पेपरला निघालेला विद्यार्थी लोकलमधून पडला; कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घटना
बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्यावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून अपघाती मृत्यू झाला. ही घटना कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.डोंबिवली येथील रहिवासी असलेला सोहम कटरे हा विद्यार्थी बारावीच्या पहिल्याच परीक्षेसाठी घरातून निघाला होता. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरही एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























