बेळगाव: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वातावरण तणावग्रस्त आहे. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत असल्याचे आरोप होत आहेत. यावरुनच या दोन्ही राज्यादरम्यानची बससेवा बंद करण्यात आली होती. अशातचं मराठी भाषिक युवकांनी व्हॉट्सअॅपवर मराठी भाषेत स्टेट्स ठेवले म्हणून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगाव येथील मच्छे गावातील हे चार युवक आहे. 'मराठी भाषिक वाघ आहे' असे हे स्टेट्स होते.


चारही तरुणांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून कर्नाटक पोलिसांनी जाब विचारत त्यांना बेदम मारहाण केली. पाठ, हात आणि पायांवर बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आलीय. मारहाण करण्यात आलेल्या तरुणांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार? असा संतप्त सवाल स्थानिक मराठी भाषिक नागरिक विचारत आहे.


दरम्यान, या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. लोकसभेतही बेळगावच्या मुद्द्यावरून रणकंदन पहायला मिळाले. शिवसेना खासदारांनी बेळगाव प्रश्नी सभात्याग केला. बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली.


दोन दिवस एसटी सेवा बंद
दोन दिवासांपूर्वी कर्नाटकमधील व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली. त्यानंतर दोन्ही राज्याकडून दोन दिवस एसटीची वाहतूक बंद करण्यात आली होती. बेळगावमध्ये कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. त्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.