बेळगाव : लग्न झाल्यावर अनेक नवविवाहित दाम्पत्ये हनिमूनसाठी जातात. परंतु बेळगावमधील दोन नवविवाहित शिवभक्त जोडप्यांनी लग्नानंतर हनिमूनला न जाता रायगड किल्ल्यावर जाऊन शिवछत्रपतींच्या चरणी शपथ घेऊन आपल्या सहजीवनाची सुरुवात केली. विशेष म्हणजे रायगडावर अनवाणी पायाने चढून महाराजांचे दर्शन घेतले. माधुरी आणि सागर गुरुनाथ चौगुले (रा.गणेश नगर, सांबरा) आणि हर्षदा आणि अभिषेक कृष्णा बुद्रुक (बाबले गल्ली , अनगोळ ) अशी जोडप्यांची नावे आहेत.


सागर आणि माधुरी यांचे लग्न डिसेंबर महिन्यात पार पडले. सागर आणि माधुरी हे पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमध्ये नोकरी करतात. दोघेही शिवभक्त आहेत. लग्नानंतर पर्यटन स्थळी न जाता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपत्ती शिवाजी महाराजांच्या राजधानीला भेट देऊन आणि महाराजांचे दर्शन घेऊन पुढील संसारिक आयुष्याला सुरुवात करण्याचे ठरवले. त्यानुसार सागर आणि माधुरी हे नवदाम्पत्य आपल्या नवविवाहित मित्र हर्षदा आणि अभिषेक बुद्रुक यांच्यासमवेत रायगडावर अनवाणी पायाने चढून महाराजांचे दर्शन घेतले.


रायगडावर या दोन नवविवाहित दाम्पत्याने प्रेरणा स्तोत्र म्हणताच गडावर उपस्थित असलेल्या लोकांनीही प्रेरणा स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. यामुळे अवघ्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच या दोन्ही दाम्पत्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदनही केले.