बेळगाव : कानडीकरणाचा वरवंटा सीमाभागात अधिकच तीव्र झाला आहे. एका ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने नोटीस, पावत्या, पत्रे मराठीत दिली म्हणून त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी जारी केला आहे.
कन्नड प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी कन्नड प्राधिकरणाचे सदस्य अनंतकुमार ब्याकुड यांनी हिंडलगा ग्राम पंचायतीत कन्नडऐवजी मराठीतून व्यवहार चालत असून कन्नड भाषा शासकीय कामकाजात वापरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी तक्रार केली. हिंडलगा ग्राम पंचायतीत कर भरणा पावत्या, नोटीस तसंच कागदपत्रे मराठीत दिली जातात, असंही ब्याकुड यांनी सांगितलं. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पंचायतीच्या उप सचिवांना हिंडलगा ग्राम पंचायतीच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश दिला.


सगळ्या व्यापारी आस्थापनावरील फलक कन्नड भाषेतच लिहिले पाहिजेत. कन्नडबरोबर अन्य भाषेत फलक असेल तर सगळ्यात मोठ्या आकारात कन्नडमध्ये लिहिले पाहिजे. जर या नियमाचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा, असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. निपाणी, चिकोडी भागात देखील कन्नडमधून सगळे व्यवहार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा, असंही प्रांताधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते.



गेल्या साठ वर्षांपासून हिंडलगा ग्राम पंचायतीत मराठीतून कारभार चालतो. सगळा कारभार मराठीत करण्यासाठी ग्राम पंचायतीने ठराव देखील केला आहे. सरकारने कन्नड भाषेत व्यवहार करण्यासाठी सक्ती करु नये. सक्ती झाल्यास त्या विरोधात आम्ही दाद मागू, अशी प्रतिक्रिया हिंडलगा ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर यांनी व्यक्त केली आहे.