मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच बीडमधील (Beed) दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. तर, बीडचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, आता अधिवेशनाच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा बीडमधील शिक्षक आत्महत्येचं प्रकरण विधानपरिषद सभागृहात उपस्थित झालं आहे. बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक नागरगोजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विधानपरिषद सभागृहातील चर्चेत उपस्थित करण्यात आली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी बीडमधील आत्महत्याप्रकरणावरुन सरकारला सवाल केला आहे. तसेच, याप्रकरणी अद्यापही संस्थाचालकांवर गुन्हा का दाखल नाही, असा जाब दानवे यांनी विचारला.
बीड जिल्ह्यातील आश्रम शाळेवर नोकरी करणाऱ्या धनंजय नागरगोजे यांना 18 वर्षांपासून पगार मिळाला नाही. याशिवाय पगाराची विचारणा केल्यानंतर संस्थाचालकाने तू फाशी घे... असा सल्ला दिला. त्यानंतर, धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत संस्थाचालकांची नावे लिहित फाशी घेतली. त्यासंदर्भात अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. विक्रम मुंडे, विजय मुंडे, अतुल मुंडे हे शिक्षण संस्थाचालक आहेत. हे शिक्षण संस्थाचालक म्हणतात तू फाशी घे आणि मोकळा होsss. आत्महत्या केलेल्या या शिक्षकाची 3 वर्षांची मुलगी आहे. मात्र, अजूनही संस्थाचालकावर गुन्हा दाखल नाही. या शिक्षकाने फाशी घेतली तरी सुद्धा अद्याप संस्थाचालकावर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला. तसेच, पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून घ्यायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
चौकशी करुन गु्न्हा दाखल होईल
शिवसेना आमदार अनिल परब यांनीही हा मुद्दा उपस्थित करत, तात्काळ संस्थाचालकावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सभागृहात केली. त्यानंतर, याप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल होईल, असे उत्तर राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिले.
काय आहे प्रकरण
धनंजय नागरगोजे हे बीडच्या केळगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. गेल्या 18 वर्षापासून ते या शाळेत काम करत होते. मात्र, 18 वर्षापासून त्यांना पगार न मिळाल्यामुळं त्यांची आर्थिक हालत खालावली होती. अखेर धनंजय याने बीडमधील कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेजवळ गळफास घेत आपले जीवन संपवले. या आधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपल्या चिमुकल्या मुलीची माफी देखील मागितली होती. ही फेसबुक पोस्ट सविस्तरपणे त्याने लिहिले होती. श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या लायकीचा नाही. तुला अजून कळत नाही तुझं वय किती आहे. ज्याला कळायला पाहिजे होते त्याला तुझा बापू कळाला नाही अशा आशयाची ही भावनिक पोस्ट होती.