Beed Parli News: राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नाथ प्रतिष्ठानने परळीत आयोजित केलेल्या कार्यक्रमावर टीका करण्यात आली आहे. याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.  सांस्कृतिक कार्यक्रमांवरून विविध सामाजिक कार्यात आणि संकट काळात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नाथ प्रतिष्ठान या संस्थेला बदनाम करण्यापेक्षा, तुमचा राग माझ्यावर असेल तर व्यक्तिगत माझ्यावर टीका करा, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 


'हममे नाम है, इसिलीये हमे बदनाम कर रहे हो?' असा शेर सुनावत धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, विविध लोककला, लावणी, सांस्कृतिक कार्यक्रम ही महाराष्ट्राच्या मातीची परंपरा आहे. अशा पारंपरिक कार्यक्रमांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 


अजय-अतुलसह अमृतानं जिंकली परळीकरांची मनं
कुठलाही कलाकार आपली कला घरात बसून झाकून ठेवून वाढवू शकत नाही, तर तो ती लोकांसमोर सादर करून वाढवत असतो आणि मोठा होत असतो. नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंडे यांनी अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना संधी उपलब्ध करून देत असतात म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजेत असे सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अजय-अतुल जोडीतील अतुल गोगावले यांनी कौतुक केले. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत परळी येथे सुरू असलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही आपली नृत्य कला यावेळी सादर केली.  
 
केवळ ट्रोल करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन गालबोट लावू नये
यावेळी अमृता खानविलकर म्हणाली की, अनेक कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात. लहान असोत की मोठ्या असोत पण महाराष्ट्राच्या कलेची उपासना समजल्या जाणाऱ्या लावणी सारख्या कार्यक्रमांवरून कोणी महिला कलाकारांना लक्ष्य करत असेल, वृत्त वाहिन्या किंवा आणखी कोणी लावणी सारख्या लोककलेला अश्लीलतेचे नाव देत असेल तर ते पाप ठरेल, महाराष्ट्राच्या लोककलेची जगभर ओळख म्हणून लावणी प्रसिद्ध आहे. अंगभर कपडे घालून, शृंगार रस सादर करणारी लावणी, त्यात काही व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा केवळ ट्रोल करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन गालबोट लावू नये असे अमृता खानविलकरनं म्हटलं.


इतर महत्वाच्या बातम्या