बीड : प्रवासादरम्यान निष्काळजीपणे जीपबाहेर हात काढल्याने एका व्यक्तीला हात गमवावा लागला आहे. वाहनाच्या धडकेत 50 वर्षीय अर्जुन डुरलेकर यांचा हात तुटला.
बीडमध्ये अंबाजोगाई जवळ लोखंडी सावरगाव मधील लातूर टी-पॉईंटवर गुरुवारी रात्री ही घटना घडली.
उस्मानाबादमधील अर्जुन सोमनाथ डुरलेकर नातेवाईकाच्या मुलीसाठी स्थळासंदर्भात अंबाजोगाईला आले होते. दिवसभराचा कार्यक्रम आटपून रात्री उस्मानाबादला परत जाण्यासाठी ते टाटा सुमो गाडीतून निघाले.
गाडी लातूर टी-पॉईंटवर आली असताना काहीतरी वस्तू बाहेर टाकण्यासाठी त्यांनी निष्काळजीपणे उजवा हात गाडीच्या खिडकीबाहेर काढला. तेवढ्यात समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनाचा फटका बसल्याने अर्जुन डुरलेकर यांचा हात दंडापासून तुटून रस्त्यावर पडला.
खाली पडलेल्या हातावरुन अनेक वाहनं गेल्यामुळे हाताचा चेंदामेंदा झाला. गंभीर जखमी झालेल्या डुरलेकर यांना नागरिकांनी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे.