Beed: राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. मराठवाड्यात एकीकडे पावसाचा जोर वाढला असून हिंगोली, नांदेड, परभणी शहराला पुरानं वेढा घातला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शुन्यावर असणारं बीडचं माजलगाव धरण थेट 18 टक्क्यांवर गेलं आहे. मृतसाठा आता जिवंत झाला असून बीडमधील धरण प्रकल्प खळाळले आहेत. मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार या भागात दिसून येत आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत १८ टक्कयांची नोंद धरणात झाल्याची अधिकृत माहिती आहे.
जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात आज दाखल झाले असून धरण भरण्यास या पाण्याचा देखील मोठा फायदा होत आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे खरिपातील कापूस,सोयाबीन,तीळ, उडीद, तुर या पिकांसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन धरणात सकाळी 10 वाजता 31 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
माजलगाव तालुक्यात मागील आठ दहा दिवसापासून गायब झालेल्या वरुणराजाने शनिवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. रविवारी मध्यरात्री थोड्या प्रमाणात तर सोमवारच्या पहाटेपर्यंत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच होता. या पावसामुळे मृतसाठ्यात असलेले माजलगाव धरण मृत साठ्याबाहेर येत थेट 18 टक्क्यावर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
माजलगाव एरवी भरते परतीच्या पावसावर
माजलगाव धरण दरवर्षी हे परतीच्या पावसावरच भरते. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी देखील अत्यल्प पाणीसाठा असलेले माजलगाव धरण परतीच्या पावसावरच भरले होते. मागील वर्षी सरासरीहून कमी पाणीसाठा झाल्यानं माजलगाव धरण कोरडंठाक झालं होतं. दोन दिवसांपूर्वी मृतसाठ्यात असणारं माजलगाव धरण आता भरेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. .
31 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू
सध्या पावसाच्या पाण्याची आवक धारणात सुरू असल्याने सोमवारी सायंकाळी माजलगाव धरण 18 टक्क्यावर आले आहे आणि जायकवाडी धरणातून व पावसाच्या पाण्याची आवक माजलगाव धरणात सुरूच आहे. दरम्यान सोमवारी सकाळी दहा वाजता माजलगाव धरणात 31 हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती..जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात दाखल हाेत असून शहरासह तालुका परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बीड जिल्ह्यातील धरण प्रकल्प ओसंडून वाहतायत
बीड जिल्ह्याभरात झालेल्या पावसामुळे छोटे-मोठे प्रकल्प आता ओसंडून वाहत आहेत.सलग दोन दिवसाची संततधारेमुळे धारुर तालुक्यातील हिंगणी येथील तलाव भरल्याने तलावाच्या सांडव्यावरून पाणी पडू लागले आहे. तर दुसरीकडे सरस्वती नदीला पूर आला आहे.हिंगणी तलाव भरल्याने आता धारूर चा पाण्याचा प्रश्न मिटला असून याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार आहे.
मराठवाड्यात मुसळधार पाऊस
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं सर्वत्र एकच हैदोस घातला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज देखील विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.