Beed : बालवयापासून मित्र असलेले आणि पुढे राजकीय आयुष्यात सुद्धा कायम मैत्री जपत आपापली राजकीय भूमिका निभावणारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या मैत्रीची ओळख निर्माण करून गेले. अशा मैत्रीचा गौरवशाली इतिहास मराठवाड्याला लाभला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे. यांच्या मैत्रीसंदर्भातील किस्से आजही नेते जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवतात.


विशेष म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोघांच्या ही राजकीय भूमिका कायम वेगळ्या होत्या. मात्र महाविद्यालयीन काळापासून सोबत शिक्षण घेतलेले दोन मित्र कधीही वैयक्तिक एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी करताना कधीच पाहायला मिळाले नाहीत. अगदी जेव्हा काँग्रेसकडून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पद विलासराव देशमुख यांच्याकडे होतं तर राज्याचे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी गोपीनाथ मुंडे यांना सक्षमपणे निभावताना संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. केवळ मैत्री पुरतेच नाही तर राजकीय उंची गाठलेल्या विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या इतकं राजकीय वलय मराठवाड्यातल्या इतर नेत्याला अद्याप तरी लाभलेले नाही.


असेच बालमित्र असलेले दोघेजण आज बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दोन पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काही दिवसांपूर्वी ज्यांच्यावर जबाबदारी आली ते राजेसाहेब देशमुख आणि नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते राजेश्वर चव्हाण. हे दोन मित्र सुद्धा अगदी बालवयापासून एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. 


36 वर्षांची मैत्री...


काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण या दोघांचे अगदी महाविद्यालयापासूनचे मैत्रीचे संबंध आहेत. अंबाजोगाईत 1986 साली दोघांची मैत्री झाली. दोघांतही महाविद्यालयीन काळातच नेतृत्व करण्याचे गुण होते. त्यामुळे विद्यार्थी नेता म्हणून त्या दोघांनीही 86 साली काम करायला सुरुवात केली. राजेश्वर चव्हाण आणि राजसाहेब देशमुख हे दोघे जवळपास आठ वर्ष एकाच खोलीमध्ये राहायला होते. माध्यमिक शिक्षणानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी विद्यालयातील होस्टेलमध्ये काही दिवस एकत्रित झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी लातूरला दोघे गेले आणि तेही एकाच ठिकाणी राहिले.  विशेष म्हणजे दोघांमध्ये किमान वयाचा चार वर्षाचं अंतर असलं तरी कायम मित्र म्हणून अनेक कार्यक्रमात हे दोघेजण आजही पाहायला मिळतात.


एक जण जिल्हा परिषदेचा सदस्य तर दुसरा पंचायत समिती सदस्य 


1992 सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजेश्वर चव्हाण हे बर्दापूर जिल्हा परिषद गटातून निवडून आले. तर याच गटातून पंचायत समिती गणातून राजेसाहेब देशमुख निवडून आले. हे दोघे मित्र एक जिल्हा परिषदेचा सदस्य मला तर दुसरा पंचायत समितीचा सदस्य झाला. विशेष म्हणजे या दोघांनी ही आतापर्यंत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच वर्ष काम केलं. कधी काँग्रेसमध्ये या दोघांनी पदं भूषवली तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांना पदं मिळाली आहेत.


राजेसाहेब देशमुख आणि राजेश्वर चव्हाण हे उच्च शिक्षणासाठी लातूर शहरांमध्ये एकाच रुममध्ये नऊ वर्ष राहिले. हळूहळू दोघांनीही राजकारणामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करायला सुरुवात केली. पुढे राजेश्वर चव्हाण हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून उभे राहिले, तेव्हा राजेसाहेब देशमुख यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली होती आणि ते निवडून देखील आले होते. अगदी महाविद्यालयीन काळापासून असलेल्या मैत्रीला राजकारणामुळे आजपर्यंत देखील त्यांनी तडा जाऊ दिला नाही.