बीड : अनेक हत्यांच्या घटनांमध्ये कुठलाच पुरावा सापडत नसल्याने हत्या करणाऱ्या व्यक्तीला शोधणे पोलिसांना कठीण जातं अशीच एक घटना बीडच्या केजमध्ये घडली. मात्र मुलाच्या प्रेताचा पंचनामा चालू असताना वडील मात्र एका हॉटेलात जाऊन नाश्ता करत होते. एवढ्या एका गोष्टीवरून पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले आणि जन्मदात्या पित्यानेच आपल्या व्यसनी मुलाला संपवल्याचे  पुढे आले. 


केज तालुक्यातील दैठणा येथील विलास चंद्रकांत मुळे (38) या तरुणाचा मृतदेह गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. मात्र हा  खून कोणी कोणी केला व कोणत्या कारणासाठी केला हे काहीच समजत नव्हते. विशेष म्हणजे या खुनानंतर सुद्धा विलास या घरचे लोक काहीही बोलायला तयार नव्हते. 


खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी गावांमध्ये चौकशी केली. त्यावेळी विलास काहीच कामधंदा करत नव्हता मात्र तो दिवसभर नशेमध्ये राहायचा. विलास दारूच्या आहारी गेला होता. याच दारुमुळे तो आई-वडिलांनाही त्रास देत होता. त्याच्या याच वागण्याला घरचे सगळे कंटाळले होते. रोज दारू पिण्यासाठी आई-वडिलांकडे पैसे मागायचा. पैसे नाही दिले तर घरातील एखादी वस्तू विकून तो दारू प्यायचा अशी माहिती पोलिसांना गावातून मिळाली.


बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता विलास घरी जेवण करून दारू प्यायला. त्याची आई गयाबाई मुळे ही कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला गावात गेली होती. तिला एकाने रात्री 12.30 वा विलास स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला घाणीत दारू पिऊन लोळत असल्याची माहिती त्याची आई गयाबाई हिला दिली. तिने ही माहिती विलासचे वडील चंद्रकांत मुळे यांना सांगितली. त्यामुळे चंद्रकांत मुळे यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी घरातील लोखंडी घण घेऊन ते त्याच्याकडे गेले आणि रागाच्या भरात तो लोखंडी घण त्यांनी मुलगा विलास याच्या डोक्यात हाणला.  घणाचा घाव वर्मी बसताच डोके फुटून विलासचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर चंद्रकांत मुळे हे घरी आले. अंगावरील रक्ताने माखलेले अंगावरील धोतर काढून ते धुण्यासाठी टाकले. दुसरे कपडे घालून झोपी गेले. त्या नंतर गावात विलास मुळे याचा मृत्यू हा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी केला असल्याची माहिती पसरली. त्या नंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.


खुनाचा तपास चालू होता, मात्र पोलीस अधिकाऱ्यांना काहीच पुरावा सापडत नव्हता. पण चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले की, विलासच्या मृत्यू बाबत त्याच्या कुटुंबातील सदस्य कुणी काहीच बोलत नव्हते. त्याचे वडिलांच्या चेहऱ्यावर मुलगा मयत झाल्याचे दुःख दिसत नव्हते आणि पोलीस प्रेताचा पंचनामा करीत असताना चंद्रकांत मुळे यांनी हॉटेल मध्ये जाऊन नाष्टा केला. नेमकी हीच गोष्ट पोलीस अधिकाऱ्यांना खटकली आणि त्यांनी कुठलाही संशय न येऊ देता अंत्यविधी आटोपताच त्यांना ताब्यात घेतले.  जन्मदात्या मुलाचा खून झाल्यानंतर त्याचा पंचनामा चालू असतानाच वडील मात्र बिनधास्तपणे हॉटेलमध्ये नाश्ता करत होते ही बाब खुनाचा उलगडा करायला महत्त्वाची ठरली.  पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चंद्रकांत मुळे यांनी खुनाची कबुली दिली. मयत विलास मुळे याच्या आईच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.