Beed : अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान (Gyaneshwari Anjan) या तरुणीला सनगाव येथील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.  या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मारहाण प्रकरणी सरपंचसह 10 जणांवर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनवरुन ऑल इंडिया पँथर सेनचे अध्यक्ष दीपक केदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पालकमंत्र्यांनी बीड साठी वेळ द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या मारहाण प्रकरणातील आरोपींवर  मोक्कासारखी कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

ॲड. ज्ञानेश्वरी अंजान यांच्यावर झालेला हल्ला हा पुरुषसत्ताक मानसिकतेतून झाला

ॲड. ज्ञानेश्वरी अंजान यांना झालेल्या मारहाणीनंतर आता बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडसाठी वेळ देण्याची मागणी होत आहे. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था राखली जात नाही. पालकमंत्र्यांनी वेळ द्यावा अन्यथा त्यांनी  राजीनामा द्यावा असे दीपक केदार म्हणाले. ज्ञानेश्वरीवर झालेला अमानुष हल्ला हा क्रूरपणाचा कळस गाठणारा आणि मानवतेला काळीमा फासणारा आहे. पुरुषसत्ताक मानसिकतेतून हा हल्ला झालेला आहे.आरोपींवर मोकासारखी कारवाई झाली पाहिजे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय करु नका. त्यांची धिंड काढा, जिजाऊंच्या लेकीवर हा हल्ला झाल्याचे दीपक केदार म्हणाले आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सनगाव येथील महिला वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांनी ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने लाऊड स्पीकर लावू नयेत व घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच ज्ञानेश्वरी अंजान हिच्या आईची कोर्टात सुरू असलेली 307ची केस काढून घेण्यामुळेही वाद होत होते. अशातच 14 एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी अंजान (Gyaneshwari Anjan) हिला मारहाण करण्यात आली होती. सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पाईपने ज्ञानेश्वरीला प्रचंड मारले. ही मारहाण इतकी भीषण होती की, ज्ञानेश्वरी अंजान यांच्या अंगातील रक्त साकळले असून त्यांच्या पाठीवर काळे-निळे वळ उठले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी कारवाईच्या बडगा उगारत कारवाई केली आहे. 

10 जणांवर गुन्हा दाखल

वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान मारहाणप्रकरणी  सरपंच अनंत रघुनाथ अंजान यांच्यासह सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे या दहा जणांवर गुन्हा दाखल (Beed Crime News) करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बीड जिल्ह्यात खळबळ, आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी, शिवीगाळ; पोलिसांत तक्रार