(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed : लग्न का लावून देत नाही म्हणून तरुणाने केला मुलीच्या वडिलांचा खून, बीडमधील धक्कादायक घटना
तुमच्या मुलीसोबत लग्न का लावून देत नाही असा जाब विचारत बीडमध्ये एका माथेफिरुने मुलीच्या वडिलांचा खून केला आहे.
बीड: एका 17 वर्षीय मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून या मुली सोबत माझे लग्न लावून द्या अशी मागणी करत एका माथेफिरू तरुणाने त्या मुलीच्या वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यातल त्या वडिलांचा मृत्यू झाल्याची अतिशय हृदयद्रावक घटना बीडच्या केज मध्ये घडली आहे.
रमेश एकनाथ नेहरकर (वय 45) असे त्या मृत पित्याचे नाव आहे. केज तालुक्यातील पिसे गावचे रहिवासी असलेले रमेश नेहरकर हे सानेगुरुजी ऊसतोड मुलांच्या शाळेमध्ये सेवक म्हणून काम करत होते.
तांबवा या गावच्या भागवत चाटे या तरुणाने रमेश नेहरकर यांच्या 17 वर्षीय मुलीचे फोटो आधी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या संदर्भामध्ये रमेश नेहरकर यांनी भागवत चाटे याला जाब विचारला होता. जाब विचारल्यानंतर भागवतने तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दे अन्यथा खून करेल, अशी धमकी दिली होती.
दोन दिवसापूर्वी, म्हणजे शनिवारी कळंब येथून रमेश नेहरकर आपल्या दुचाकीवरून केजकडे येत होते. वाटेत दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेख फरीद बाबा दर्गा आणि संत सेना महाराज मंदिराच्याजवळ भागवत चाटे आणि त्याच्या दोन साथीदारांनी नेहरकर यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरु केला.
भागवतने धावत्या दुचाकीवरील नेहरकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नेहरकर रस्त्यावर कोसळले. त्यानंतर भागवत दोन्ही साथीदारासह केजच्या दिशेने निघून गेला. जखमी नेहरकर यांना पाहून नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर पीआय शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी रमेश नेहरकर यांना रुग्णवाहिकेतून केज येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने नेहरकर यांना पुढच्या उपचारासाठी लातूर येथे एका खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारादरम्यान आज सकाळी नेहरकर यांचा मृत्यू झाला. भागवत नेहरकर यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे नातेवाईक आणि गावकरी केजमध्ये जमा झाले. जोपर्यंत भागवत नेरकर यांचे मारेकरी अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतली होती.
आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल..
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात रमेश नेहरकर यांची पत्नी पुष्पा नेहरकर यांच्या तक्रारीवरून शनिवारी भागवत चाटे आणि दोन अनोळखी यांच्याविरुद्ध गु. र. नं. 114/2022, भा. दं. वि. 307 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाणीत जखमी झालेल्या रमेश नेहरकर यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणातील आरोपी भागवत काटे व त्याच्या दोन साथीदार यांच्यावर खुनाचा गुन्हा केज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. हे आरोपी फरार झाले असून पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha