बीड: क्रिकेट हा पैशाचा खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेट भोवती फिरणारे ग्लॅमर इतके मोठे आहे की जगाच्या पाठीवर क्रिकेट इतकी प्रसिद्धी आणि पैसा दुसऱ्या कोणत्या खेळात नाही. पण या ग्लॅमर्सचा सगळ्या क्रिकेटर्सना फायदा होतो का? तर नाही. नशिबी आलेले अपंगत्व आणि त्यात हे क्रिकेट सारखा खेळ खेळणाऱ्या जिगरबाज खेळाडूंना या ग्लॅमरचा कोणताच फायदा मिळत नाही.

एक हजार लोकसंख्येच्या केज तालुक्यातील डोणगाव या गावातल्या मैदानावर लहानपणी ज्योतीराम क्रिकेटची प्रॅक्टिस करायचा. एका पायाने अपंग असतानाही ज्योतीराम क्रिकेट खेळत राहिला आणि याच खेळातून तालुक्यापासून देशापर्यंत खेळण्यासाठी त्याला संधी मिळाली. ज्या ग्राऊंडवर ज्योतीरामला इतर मुले खेळायला ही घेत नव्हती त्याच मुलांसाठी ज्योतीराम आज आदर्श बनलाय.

ज्योतीरामचे आई-वडील ऊसतोड कामगार. उसाच्या फडामध्ये ऊस तोडत असतानाच अचानक ज्योतीरामला ताप आला आणि या तापातून त्याला कायमचे अपंगत्व आलं. अपघाताने आलेले अपंगत्व ही ज्योतीरामला त्याच्या ध्येयापासून वेगळे करू शकलं नाही. कधीकाळी ज्या हातात कोयता होता त्याच हातातली बॅट आज देशासाठी मैदानात तळपत आहे.

ज्योतीरामची क्रिकेट कारकीर्द

  • 2005 ला तालुका संघात निवड.
  • 2008 ला जिल्हा संघात निवड, 2010 पासून महाराष्ट्र संघात निवड. 
  • पहिला बेस्ट विकेट कीपरचा अवॉर्ड 
  • सहा वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद.
  • पाच वेळा महाराष्ट्र संघ विजेता.
  • तीन वेळा बेस्ट विकेट कीपर चा पुरस्कार.
  • दोन वेळा मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार 
  • तीन वेळा बेस्ट फलंदाज. 

2019 ला त्याची भारतीय संघात निवड झाली, परंतु कोरोनामुळे ती स्पर्धा होऊ शकली नाही. 2021 ला भारत विरुद्ध बांग्लादेश एकदिवसिय सीरीजसाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा तो कर्णधार बनला. चार महिन्यांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात औरंगाबादला झालेली हीच सिरीज ज्योतीराम याच्या नेतृत्वात भारताने 2-1 अशी जिंकली आहे.

क्रिकेटमुळे ज्योतीरामचं आयुष्य मात्र बदललं नाही. ज्योतीराम आपलं घर चालवण्यासाठी बीड शहरामध्ये तेलाचा घाणा चालवतो. ज्योतीराम आणि त्याचा मेहुणा भागीदारीमध्ये हा तेलाचा व्यवसाय करतात. दिवसातले चार तास क्रिकेटचा सराव करायचा आणि उरलेल्या वेळेमध्ये व्यवसाय सांभाळायची अशी कसरत ज्योतीराम करत असतो. 

ज्योतिरामच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी आणि दोन छोट्या मुली आहेत आणि या सर्वांची जबाबदारी त्याच्या एकट्यावरच आहे. कुटुंबाची परिस्थिती हालकीची असली तरी त्याच्या खेळाचा कुटुंबाला अभिमान वाटतो. त्यामुळे क्रिकेटच्या खेळात ज्योतिरामला आपल्या कुटुंबाची मोलाची साथ मिळत आहे. ज्योतीराम खेळायला गेल्यावर त्याची पत्नी हा व्यवसाय सांभाळत आहे. 

क्रिकेट हा खेळ आपल्या गरिबांचा नाही असं ज्योतीरामची आई चंद्रभागाबाई त्याला नेहमी सांगायची. मात्र आता ज्योतीरामने याच क्रिकेटमध्ये एवढी बक्षीसं मिळवली आहेत की ती ठेवायला घरी जागासुद्धा नाही. आपल्या पोरांना आणखी खेळावं आणि जिंकावं यासाठी त्याची आई आज ही शेतामध्ये राबत आहे.

आयपीएल मधल्या खेळाडूंची बोली ऐकली की मैदानातल्या खेळापेक्षा पैशांचा खेळ क्रिकेटमध्ये मोठा आहे असे वाटू लागते. बीसीसीआयने इतर खेळाडूंना जशा सुविधा दिल्यात तशाच सुविधा दिव्यांग खेळाडूना दिल्या तर कदाचित देशासाठी खेळणाऱ्या या जिगरबाज खेळाडूंना आपले घर चालवताना निश्चितच संघर्ष करावा लागणार नाही.