अर्णी (यवतमाळ) : पाळीव कुत्र्यांमुळे यवतमाळमधील शेतकरी अस्वलांच्या हल्ल्यातून बचावला आहे. सत्तू आडे या 65 वर्षीय शेतकऱ्यावर तीन अस्वलांनी हल्ला केल्याची घटना आर्णी तालुक्यातील पाळोदी येथे घडली.

तीन अस्वलांनी सत्तू आडे यांच्यावर हल्ला केल्यानंतर, पाळीव कुत्र्यांनी अस्वलांवर प्रतिहल्ला चढवला. त्यामुळे अस्वलांनी पळ काढला. या हल्ल्यात सत्तू आडे हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.

पाळोदी गावाजवळील जंगलात सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली.

सत्तू आडे हे नेहमीप्रमाणे शेतात पऱ्हाटी काढण्यासाठी गेले असताना, त्यांच्यावर तीन अस्वलांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सत्तू आडे यांच्या मानेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

शेतातच सत्तू आडे यांचे पाळीव कुत्रे होते. आपल्या मालकावर अस्वलांनी हल्ला केल्याचे पाहताच, कुत्र्यांनी अस्वलांवर प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर अस्वलांनी तेथून धूम ठोकली.

सत्तू आडे गंभीर जखमी झाल्याने सावली सदोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.