मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने विखेंचे पक्षांतर्गत विरोधक मानले गेलेल्या बाळासाहेब थोरात यांना संधी दिली आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी थोरातांची वर्णी लागली आहे.

अहमदनगरमध्ये विखेंचे प्रतिस्पर्धी म्हणून थोरातांची ओळख राज्यभरात आहे. विखे पाटलांनी भाजपशी जवळीक साधल्यानंतर काँग्रेसमध्ये आता विधिमंडळ पक्षनेतेपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर काँग्रेसने थोरातांच्या गळ्यात विधीमंडळ नेतेपदाची माळ घातली आहे. काँग्रेसने विधानसभा गटनेतेपदी विजय वडेट्टीवार तर विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची नियुक्ती केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. विखेंचा पक्षप्रवेश हा केवळ औपचारिकता मानली जाते.



थोरात-विखे संघर्ष

भाजपप्रवेश करुन सुजय विखे अहमदनगर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात उडी घेतली होती. तर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रान पेटवले होते.

विखे-पाटलांनी थोरातांना शह देत त्यांच्याच संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडी मिळवून दिली आणि अहमदनगर, शिर्डीची जागा युतीच्या पारड्यात टाकली. सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर संगमनेर शहरासह घुलेवाडी येथे लावण्यात आले होते, मात्र हे बॅनर कोणीतरी फाडल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.

विखे 'पक्ष'विरोधी नेते

राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत झालेल्या आघाडीच्या पहिल्याच प्रचारसभेत राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला होता. सुजय विखेंचा निर्णय वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिलं, हा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिलं आहे, असं थोरात म्हणाले होते.

कशी आहे काँग्रेसची नवी टीम?

बाळासाहेब थोरात - विधिमंडळ नेते

विजय वडेट्टीवार - गटनेते, विधानसभा

नसीम खान - उपनेते, विधानसभा

बसवराज पाटील - मुख्य प्रतोद

प्रतोद - के. सी. पाडवी, सुनील केदार जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे,

शरद रणपिसे - गटनेते, विधान परिषद

रामहरी रुपनवार - उपनेते, विधान परिषद

भाई जगताप - प्रतोद, विधान परिषद