मुंबई: बाळासाहेबांना आज हिंदुहृदयसम्राट असं ओळखलं जातं, पण त्यांची खरी ओळख ही शिवसेनाप्रमुख अशी आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्यांच्या तैलचित्रावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं लिहिण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने (Balasaheb Thackeray Birth Anniversary) विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात आलं. त्यावेळी अजित पवारांनी ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. 


विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्यांना बरोबर नेण्याची भूमिका घेतली. त्यांनी कधीही मुस्लिमांना विरोध केला नव्हता. शिवसेनेचा मुंबईतील पहिला महापौर झाला. त्यावेळी बाळासाहेबांनी मुस्लिम नगरसेवकांची मदत घेतली होती. बाळासाहेब मुस्लिम विरोधक होते हे म्हणणं योग्य नाही, पण भारतविरोधी आणि पाकिस्तानधार्जिण्या लोकांच्या विरोधात होती हे मात्र नक्की,"असेही त्यांनी म्हटले.


अजित पवार म्हणाले की, "देशाची अर्थिक राजधानी मुंबईत एक आगळा वेगळा कार्यक्रम होत आहे. बाळासाहेब हे 55 वर्ष महाराष्ट्राचा अभिमान राहिले. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावणं हे अभिमानाची गोष्ट आहे. जनमानसावर जरब असलेलं दुसरं व्यक्तीमत्व नाही. त्यांच्या जगण्यात दुटप्पीपणा नव्हता, जे आत ते ओठात होतं." 


अजित पवार पुढे म्हणाले की, "भाजप सोबत युती असताना, आणीबाणीच्या काळात बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांनाही पाठिंबा दिला होता. सर्व राष्ट्रीय नेते 'मातोश्री'वरती जायचे, त्यावेळी राजकारणात कपटबुद्धी नव्हती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बांधताना त्यांनी गडकरी यांना मोकळीकता दिली होती."


उद्धव ठाकरेंची टीका 


आज विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याने हे तैलचित्र काढले आहे त्याचा अपमान करायचा नाही. परंतु तैलचित्र साकारण्यासाठी कलाकारांना वेळ दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसऱ्यांचे वडील चोरता चोरता स्वत:चे वडील कोण ते लक्षात ठेवा असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार यांच्यावर आरोप करून पाडलं आणि काल हे त्यांचेच कौतुक करत होते, मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो म्हणत आहेत. मग मी काय करत होतो? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला.   


दोन-तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. त्यावेळी त्यांनी काही कामांचं उद्धघाटन केलं. परंतु आम्ही सुरू केलेल्याच कामांच उद्घाटन त्यांनी केलं. पंतप्रधान उद्या येणार म्हणून आदल्या रात्री ही कामं सुरू झाली नाहीत. गेले तीन वर्षे आम्ही ही कामं करत होतो म्हणून तुम्ही आता त्याचं उद्घाटन करून गेलात, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.