पुणे: मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल, माझं कुळ आणि मूळ तेच आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.
बाळा नांदगावकर यांनी आज पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी गप्पा मारल्या.
महापौर कुणाचाही होवो शाहू- फुले -आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचारांचा होवो, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी व्यक्त केली.
याशिवाय यावेळी लोकांनी पंचायत समिती ते लोकसभा एकच सरकार असावं म्हणून भाजपला मतं दिली हे मान्य करावं लागेल, असंही नांदगावकर म्हणाले.
मात्र यंदा Evm अर्थात इलेक्ट्रानिक व्होटिंग मशिनबाबत खूप तक्रारी आहेत. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नांदगावकरांनी केली.
यापूर्वी बाळा नांदगावकर यांनी “मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अंतिम निर्णय आता राज ठाकरेच घेतील. राज ठाकरेंचा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, हे मी नक्की सांगू शकतो,” असं म्हणाले होते.
वाडेश्वर कट्टा
पुण्यातील वाडेश्वर कट्टा हा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र करण्यासाठी ओळखला जातो. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही इथे गप्पा रंगल्या होत्या.
महापालिका मतमोजणीच्या आदल्या दिवशी या कट्ट्यावर सर्वपक्षीय नेते गप्पांसाठी जमले होते. त्यावेळी भाजप खासदार संजय काकडे यांनी अचूक अंदाज वर्तवल्यामुळे, वाडेश्वर कट्ट्याकडून त्यांना 4 हजार रुपयांचं बक्षीसही दिलं होतं.
संबंधित बातम्या
मनसेच्या सात नगरसेवकांची शिवसेनेला साथ?
खासदार काकडेंचा अंदाज खरा, वाडेश्वर कट्ट्यावर 4 हजाराचं बक्षीस