नागपूर : आधी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि आता थेट या आयोगाचेअध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Nirgude)  यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावरच आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील आपली प्रतिक्रिया मांडली आहे. "दबाव आल्याशिवाय सदस्य राजीनामा देणार नाहीत, कदाचित यांना मराठा आयोग आणण्याचे असेल, नवीन काही लोकं भरायची असेल, या सर्व गोष्टी समोर येतीलच अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मात्र, अशाप्रकारे टीका करतांना त्यांचा रोष कोणावर आहे याबाबत त्यांनी थेट उल्लेख करण्याचे टाळल्याचे देखील यावेळी पाहायला मिळाले. 


'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना भुजबळ म्हणाले की, "आधी सदस्यांनी राजीनामा दिला आणि आता थेट अध्यक्षांनी दिला आहे. मला देखील हे गूढ उलगडत नाही. कारण मी राजीनामा देणाऱ्या सर्वांशी बोललो, माञ ते कारण सांगायला तयार नाहीत. असं कळलं दोन मंत्र्यांनी दबाव टाकला परंतु ते स्पष्ट बोलतं नाही. माझं स्पष्ट मत आहे, कुठून तरी दबाव आल्याशिवाय सदस्य राजीनामा देणार नाहीत. कदाचित यांची मराठा आयोग आणण्याची हालचाल असेल. या आयोगात असलेल्या लोकांना त्यांची अडचण असेल, त्यांचे मतभेद असतील, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असेल. त्यामुळं राजीनामा देण्याचे खरं कारण लोकांसमोर यायलाच पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. 


मागासवर्ग आयोगाचं मराठा आयोग व्हायला नको


पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, "मी सर्व सदस्यांना सांगितलं, राजीनामा देऊ नका. परंतु, त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी राजीनामे दिले आहे. माझी मागणी एवढीच आहे की, मागासवर्ग आयोग मागासवर्ग आयोगाचं राहिला हवा, तो मराठा आयोग व्हायला नको," असा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे. 


किल्लारीकरांचा मोठा गौप्यस्फोट


दरम्यान, मागासवर्ग आयोगातील सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यावर बालाजी किल्लारीकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "संपूर्ण समजाचे आरक्षण झाले पाहिजे आणि तुलनात्मक अभ्यासाच्या आधारावर मराठा समाजाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली होती. मात्र, याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप होता. तसेच, गोखले इन्स्टिट्यूट यांच्या मार्फतच हे काम गेले पाहिजे. तर, मराठा समाजाचा संक्षिप्त सर्वेक्षण करावा, व्यापक स्वरूपात सर्वेक्षण होऊ नयेत. जेणेकरून हे सर्वेक्षण लवकर होईल, असे फडणवीस यांचे मत होते, असा गौप्यस्फोट मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेले सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी केलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मागासवर्ग आयोगातील राजीनाम्याबाबतचे कारण अखेर समोर आलेच?; किल्लारीकरांचा मोठा गौप्यस्फोट