Babasaheb Deshmukh on Shahaji Bapu Patil : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील ( Shahaji Bapu Patil) यांच्यावर सडकून टीका केली आहे. माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये घालण्याची धमकी देण्यापेक्षा, मी गणपतराव देशमुख साहेबांचा नातू आहे, हिंमत असेल तर मला जेलमध्ये घालून दाखवा, अशा शब्दात बाबासाहेब देशमुखांनी शहाजीबापूंना खुलं आव्हान दिलं आहे.
तुमचं सरकार आहे म्हणून गरीब कार्यकर्त्यांना वेठीस धरु नका
कोळा जिल्हा परिषद गटाच्या प्रचार सभेत आमदार बाबासाहेब देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आणि दडपशाहीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. दोन दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटील यांनी एका सभेत शेकापच्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्याचा समाचार घेताना बाबासाहेब देशमुख म्हणाले की, तुमचं सरकार आहे म्हणून गरीब कार्यकर्त्यांना वेठीस धरु नका. या तालुक्यातली जनता आता तुमची दादागिरी सहन करणार नाही. कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर बाबासाहेब देशमुख शांत बसणार नाही असे ते म्हणाले.
7 हजार कोटी आले होते, तर मग रस्त्यांची दुरवस्था का ?
शहाजीबापूंनी विधानसभा निवडणुकीत 7 हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना बाबासाहेब म्हणाले, जर 7 हजार कोटी रुपये आले होते, तर मग आज ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था का आहे? तो पैसा नेमका कुठे गेला, याचे उत्तर आधी जनतेला द्या, असा सवाल करत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
हिशोब मांडायला तुमचं आयुष्य पुरणार नाही, एवढे उपकार आबासाहेबांनी या तालुक्यावर केलेत
विरोधकांकडून सातत्याने विचारल्या जाणाऱ्या 50 वर्षांच्या हिशोबावरही बाबासाहेब देशमुख यांनी भाष्य केले. स्वर्गीय आबासाहेबांनी 50 वर्षांत काय केलं, हे इथल्या कष्टकरी शेतकऱ्याला आणि घराघरात पोहोचलेल्या पाण्याला विचारा. हिशोब मांडायला तुमचं आयुष्य पुरणार नाही, एवढे उपकार आबासाहेबांनी या तालुक्यावर केले आहेत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. बाबासाहेब देशमुखांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सांगोल्यात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Shahaji Bapu Patil : संजय राऊत यांनाही गुवाहाटीला यायचं होतं, पण....; शहाजी बापू पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट, सगळंच सांगितलं!