Aurangabad Water Issue : आधी चार ते पाच दिवसाला पाणी येणाऱ्या औरंगाबादकरांना (Aurangabad News) पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. कारण एका उंदराने अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा 11 तासांसाठी बंद पाडला होता. तर आता शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, औरंगाबादकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भर पावसात औरंगाबादकरांवर पाणी संकट ओढवले आहे.


त्याचं झालं असं की, सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जायकवाडी पंपगृहातील पंप क्रमांक 4 च्या फिडरमध्ये अचानक एक उंदीर घुसला. त्याने घातलेल्या गोंधळानंतर शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर खराब झालं. याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतलं. मात्र या संपूर्ण दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 13 तास लागले. त्यामुळे या काळात शहरात थेंब भर सुद्धा पाणी आलं नाही.


नागरिकांना नाहक मनस्ताप....


या घटनेमुळे जायकवाडी धरणातून येणारी पाणीपुरवठा योजना तब्बल 13 तास बंद होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. नागरिकांना एक ते दोन दिवस उशिरा पाणी येणार आहे. आधीच पाच ते सहा दिवसांनी येणारे पाणी आणखी दोन दिवसांनी वाढल्याने, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. एकीकडे जायकवाडी धरण 100 टक्के भरलंय, मात्र तरीही औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी काही मात्र वेळेवर मिळत नाहीये.


सतत पाणीपुरवठा विस्कळीत...


गेल्या आठवड्यात 700 मिमि व्यासाची जलवाहिनी बिडकीन गावाजवळ फुटली होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी तब्बल 30 तासांचा कालावधी लागला. त्यानंतर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण याचवेळी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पंपात पुन्हा तांत्रिक बिघाड झाला. या दोन्ही घटनांमुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यातच आता उंदीरमामाच्या प्रतापामुळे पुन्हा एकदा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.


जायकवाडीत पंपगृहातील मेनहोलमध्ये उंदीर शिरल्यामुळे स्पार्किंग होऊन काल सोमवारी पहाटे वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे नवीन आणि जुन्या अशा दोन्ही योजनांवरील पाणी उपसा बंद पडला. त्याचा परिणाम पाणी पुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे. तांत्रिक बिघाड असो किंवा अजून काही कारण असो आणि आता उंदीर. औरंगाबादकरांना पाण्याच्या बाबतीत अडचणी मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत, हे मात्र खरं...


इतर महत्वाच्या बातम्या



Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी, सतर्कतेचा इशारा मात्र कायम