औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad Vaccine)  ज्या व्यक्तींनी लसीकरणाचा एकही डोस घेतलेला नाही किंवा एक डोस घेऊन पुढील डोस घेण्याची तारीख  होऊन गेल्यावरही दुसरा डोस घेतलेला नाही अशा व्यक्तींना 500 रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. दंडामधील जमा झालेली 50 टक्के रक्कम ही पोलीस प्रशासन व 50  टक्के रक्कम मनपा फंडात जमा करण्यात येणार आहे. 15 डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.


 कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे.  त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी  15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले होते. या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी  महाविद्यालय, खाजगी क्लासेसमधील ज्या शिक्षकांनी कोविडच्या दोन्ही लसी घेतलेल्या आहेत, त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा आणि ज्यांनी लस घेतलेली नाही अशा शिक्षकांनी प्रत्येक आठवड्याला कोविड चाचणी बंधनकारक केली आहे.  


औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू म्हणजे किराणा, स्वस्तधान्य, पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तू या लसीकरणाचा पहिला डोस घेतल्या शिवाय मिळणार नाहीत असा निर्णय घेतला. या निर्णयानंतर औरंगाबाद जिल्यात रोज 10 हजार लस वाढल्याचा दावा जिल्हाधिकारी यांनी आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही दुकानात खरेदीसाठी लसींचा पहिला डोस घेतला नसेल तर तुम्हाला दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शॉपिंग मॉल,  किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीच्या पहिल्या डोसच प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंप, गॅस, रेशन दुकानात खरेदी करायचे असेल तर कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाईल. मात्र बिल देताना लसीकरणाचा पहिला डोस प्रमाणपत्र आवश्यक आहे.