औरंगाबाद: पोलिसात भरती होण्यासाठी कोण-कोण काय करेल हे सांगता येत नाही. नाशिकमध्ये कमी उंची असलेल्या उमेदवाराने विग घातला होता, अकोल्यात डोक्यावर पॅकिंग क्लीप चिकटवली होती, तर औरंगाबादमध्ये उमेदवाराने चक्क पायाला नाणे चिकटविले होते.
आता तर औरंगाबाद पोलीसांनी ना शारिरीक, ना लेखी परिक्षा तरीही पोलीस भरतीमध्ये मेरीटमध्ये पास करणाऱ्यांचं एक रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे.
पोलिसांनी तरुणांची एक टोळी जेरबंद केली आहे. या उच्चशिक्षीत तरुणांनी आख्या ठाणा पोलीसांना उल्लू बनवले आहे. यातील तेजराव साबळे आणि भारत रुपेकर हे दोन तरुण, कोणतीही शारिरीक किंवा लेखी परिक्षा न देता ठाणे आयुक्तालयात पोलीस भरती प्रक्रीयेत अव्वल आले आहेत.
हे सर्व तरूण औरंगाबाद शहराजवळील काद्रांबाद गावातील आहेत.
तेजराव साबळे आणि भारत रुपेकर यांनी ठाणे आयुक्तालयात पोलिस भरतीसाठी अर्ज केला. तेजराव साबळे यांनी शारिरीक चाचणीसाठी झनक चरांडेला उभा केलं, तर लेखी परिक्षा राजू नागरे नावाच्या तरुणानं दिली.
तर भारत रुपेकर याची शारिरीक चाचणी वाहब नवाब शेखने, तर लेखी परिक्षा दत्ता नलावडेने दिली.
यासाठी शारिरिक चाचणी देणाऱ्या तरुणांना प्रतेकी 1 लाख मिळाले, तर लेखी देणाऱ्या तरुणांना साडेतीन लाख मिळाले. या तरुणांच्या टोळक्यानं यासाठी अत्याधुनीक यंत्रणेचाही वापर केला.
यातील लेखी परिक्षा देणारे दत्ता नलावडे आणि राजू नागरे हे एमपीएससी परिक्षेची तयारी करणारे तरुण आहेत. यातील भारत रूपेकर नावाचा तरूण फरार आहे
पोलीस खात्यात कुठलीही शारिरीक चाचणी, लेखी परिक्षा न देता पोलीस भरतीमध्ये अव्वल येण्याचं यश मिळवणाऱ्या या तरुणाच्या पराक्रमामुळे, ठाणे पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कारण हे डिवाईस आणि मोबाईल परिक्षा केद्रांपर्यंत पोहोचला कसा? शारिरिक चाचणी, लेखी परिक्षा देताना वेगवेगळे अमेदवार आले कसे? त्यांचे आयकार्ड कसे तयार झाले? याच ठाणे पोलीसातील काही अधीकारी यांच्यासोबत सहभागी आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी पोलीस भरती प्रक्रीया पारदर्शक केली. त्यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी मुलं पोलीसात भरती झाली. मात्र या उच्च शिक्षित तरुणांनी त्यातही गैरमार्ग शोधलाच आणि त्याचमुळे त्यांच्या हातात बेड्या आहेत.
मुंबईतही डमी परिक्षार्थी उभा केल्यानं औरंगाबादच्या एका तरुणाला अटक केली आहे. त्यामुळे या तरूणांच्या टोळक्यानं आणखी किती मुलं अशाप्रकारे पोलीस खात्यात घुसवली आहेत, यांचा औरंगाबाद ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.