ATM मध्ये पुन्हा खडखडाट, पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर रांगा
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 11 Apr 2017 02:15 PM (IST)
मुंबई : नोटाबंदीनंतर उसळलेला चलनकल्लोळ पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे बँकांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र एटीएएम का रिकामे आहेत, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई आणि पुणे शहरासह अनेक ठिकाणी एटीएम गेल्या तीन-चार दिवसांपासून रिकामे आहेत. त्यामुळे ग्राहकांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरु आहे. जिथे एटीएममध्ये रक्कम असल्याचं समजतं, तिथे पैसे काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडते. एटीएएम का रिकामे आहेत, याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. नोटाबंदीनंतर ओढावलेली स्थिती एका अर्थाने पुन्हा अनुभवायला मिळत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बँकांबाहेर ज्याप्रकारे रांगा लागत होत्या, त्याची पुनरावृत्ती होत आहे. गेल्या आठवड्यातही एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ही स्थिती पूर्ववत कधी होणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.