Pankaja Munde Dasara Melava : मी गरीब माणसाचं भलं करण्याचं काम केलं आहे. मी कधीच भेदभाव केलेला नाही. लोकसभेला झालेली गडबड आपल्याला पुसून टाकायची असल्याचे आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये केले. बीड जिल्ह्यातील भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की उदयनराजे यांनी मला घरात नेलं आणि माझ्या हाताने आरती केली तेव्हा त्यांच्या वडिलांच्या बाजूला गोपीनाथ मुंडेंचा फोटो होता. मात्र, आज राज्यात काय स्थिती आहे? अशी विचारणा पंकजा मुंडे यांनी केली. एखाद्याच्या गाडीचा अपघात झाला तर चालकाचे जात विचारली जाते. चिमुकलीवर अत्याचार झाल्यास त्याची जात विचार जात विचारली जाते. ही वेळ पाहण्यासाठी आयुष्यातील 22 वर्षे घालवली का? अशी विचारणा पंकजा मुंडे यांनी केली. 



पंकजा मुंडे म्हणाल्या, अस्सलाम वालेकुम! नेमकं घडलं तरी काय?


पंकजा मुंडे मेळाव्याला संबोधित करण्यासाठी उभं राहताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी एक मुस्लीम कार्यकर्ता सुद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा उंचावून लक्ष वेधत होता. यावेळी, पंकजा मुंडे यांचं लक्ष जाताच त्यांनी अस्सलाम वालेकुम म्हणत त्याला प्रतिसाद दिला. मेळाव्यासाठी मुस्लीम बांधव सुद्धा आल्याचे त्या म्हणाल्या. संपूर्ण राज्यातून अठरापगड जातीचे माझे बांधव असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. आम्ही मंचावर आल्यानंतर नेहमीच तुम्हाला दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना मला तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली असल्याचे त्या म्हणाल्या. या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी राज्यव्यापी दौरा करणार असल्याची घोषणा केली. आगामी निवडणुकीत मतदान केल्याशिवाय कोणीही ऊस तोडणीस जाऊ नका, मला वचन द्या असे आवाहनही त्यांनी केले.


दरम्यान, पंकजा मुंडे मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मी सत्तेला चिकटून बसण्यासाठी इथं आलेली नाही. मला आमदारकीचं काही नाही, पण पाच लोकांनी जीव दिला त्या आमदारकीचं गोड काय वाटणार? त्या म्हणाल्या की माझ्याकडे कोणतेही पद नसताना तुम्ही मागील काही वर्ष माझ्याकडो इथं आलाच ना? तुम्हाला अभिमान वाटतो म्हणून हेलिकॉप्टरने मी येते, नाहीतर मी बैलगाडीने येईन असे पंकजा मुंडे म्हणाल्या.


त्यांनी सांगितले की शिवरायांनी मावळ्यांची मोट बांधून स्वराज्याची स्थापना केली. आज लाडकी बहीण असं म्हटलं जातं. मात्र लाडक्या बहिणीला ताकद देण्याचे काम सावित्रीबाईंनी केलं.गरिबांसाठी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खर्च केला असल्याचे त्यांनी सांगितले. आता घोडं मैदान दूर नसल्याचेही त्या म्हणाल्या.  त्या पुढे म्हणाल्या की लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू आहेत. माझ्या दसऱ्या मेळाव्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही. मात्र ते माझा सन्मान करून आले आहेत. त्यामुळे मी स्वागत करत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.