Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Devendra Fadnavis: आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात जवळपास 95% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचतील, असंही फडणवीसांनी म्हटलंय.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी 5000 रुपये दुष्काळ मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून, उर्वरित रक्कम आज आणि उद्या जमा होईल. राज्यावर दुष्काळाचं सावटं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वीच ही रक्कम देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. तर आज बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये हे देण्याचं आपण घोषित केलं होतं त्यानुसार आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात जवळपास 95% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचतील.(Devendra Fadnavis)
पाच टक्के थोडे मागे पुढे होतात, कारण खात्यांमध्ये काही अडचणी असतात. पण आतापर्यंत जसं मी सांगितलं की 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेत आणि पुढच्या दोन दिवसात बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जातील त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी आहे, या योजनेच्या अंतर्गत आज पुन्हा 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 4764 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत, आज आपण जमा केले आहेत यापैकी सर्वाधिक शेतकरी मराठवाड्यातले आहेत, आज जवळपास मराठवाड्यातल्या दोन लाख 76,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे राज्य सरकारच्या वतीने जमा करण्यात आलेले आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.(Devendra Fadnavis)
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, आता जर आपण एकूण बघितलं तर जवळपास 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे आपण त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि जवळपास 19 हजार कोटी रुपये हे आपण कर्जमाफीच्या करता त्या ठिकाणी जमा केलेले आहेत, अजूनही याद्यांचं प्रमाणीकरण चाललंय जसं जसं प्रमाणीकरण होत राहील तशा तशा त्या खात्यांमध्ये हे पैसे भरण्याची कारवाई आपली सुरू राहील त्यामुळे एकूणच हे जे काही महायुतीच सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आणि मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न हा आमचा चाललेला आहे आणि त्याचे प्रत्यक्ष पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आम्ही सगळ्यांनी मिळूनच हा निर्णय घेतलेला आहे माझे आदेश नाही आहे, सगळ्या मंत्र्यांशी चर्चा करून सगळ्यांना असं वाटतंय की आपण दिवाळी ही शेतकऱ्यांसोबत साजरी केली पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल की, दिवाळीच्या निमित्ताने कोणाच्यातरी घरी जायचं शेतकऱ्यांकडे जायचं त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायची असा आम्ही प्रयत्न करू.
राज ठाकरेंच्या आंदोलनाच्या प्रतिक्रियेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की आमचे मोर्चे कशाकरता आहेत हे जर समजून घेतलं तर कदाचित अशा पद्धतीने ते बोलणार नाहीत. हे मोर्चे अराजकतेच्या विरोधातले मोर्चे आहेत. संविधान वाचवण्याकरता मोर्चे आहेत. ज्या प्रकारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडी या देशामध्ये व्यवस्था परिवर्तन रेजिम चेंज करण्याचा प्रयत्न करते आहे आणि रेजिम चेंजचा अर्थ संविधान बदलणे हाच असतो त्यामुळे रेजिम चेंज करण्याचा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्याकरता केवळ तेच रस्त्यावर येऊ शकत नाही आम्हीही रस्त्यावर येऊन याचा मुकाबला करू शकतो आणि ते जेवढे लोक घेऊन रस्त्यावर येतात, त्यापेक्षा जास्त लोकांचे समर्थन हे भारतीय संविधानाला आहे भारतीय लोकशाहीला आहे आणि अराजकतेच्या विरोधात आहे, म्हणून आमचे हे मोर्चे चालेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राजू शेट्टी यांचं आंदोलन आणि रास्ता रोकोवरती प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेवटी माझा सवाल आहे की या आंदोलनाच नुकसान कोणाला होतंय ते केवळ आणि केवळ शेतकऱ्यांना होतंय आणि म्हणून माझी अपील आहे, राज्य सरकार चर्चा करते शेवटी प्रश्न कारखाने आणि शेतकरी यांच्यामधला आहे, कारण एफआरपी ही देणं बंधनकारक आहे, ती शासनाने घोषित केली आहे. ती दरवर्षी आपण देतो. एफआरपी पेक्षा जास्त ही किंमत मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. शेतकरी आणि कारखानदार या दोघांमध्ये सातत्याने या संदर्भात चर्चा चाललेली आहे. राज्य सरकारची भूमिका मध्यस्थाची आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत की यातन मार्ग निघाला पाहिजे. आणि शांतपणे हे आंदोलन संपलं पाहिजे. आता हसन मुश्रीफ आमचे जे मंत्री आहेत यांनाही आम्ही असं सांगितलेलं आहे की त्यांनी मध्यस्थतेची बोलणी करावी.
महत्त्वाच्या बातम्या






















