बीड : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी परळी, आष्टी आणि माजलगाव या मतदार संघात राष्ट्रवादी काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर, केज आणि गेवराई या ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. बीडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधे कांटे की टक्कर सुरू आहे.

बीडमध्ये सहापैकी सहा जागा युतील मिळणार असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, मतदारांनी हे अंदाज सपशेल खोटे ठरविले. सर्वात धक्कादायक निकाल परळी येथील आहे. परळी मतदारसंघ हा विद्यामान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी निर्णायक आघाडी देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नाही. धनंजय मुंडे यांचा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे.

केजमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपच्या नमिता मुंदडा या राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. माजलगाव मध्येही भाजपचे रमेश आडसकर आणि राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांच्या जोरदार रणधुमाळी झाली होती. मात्र, इथे प्रकाश सोळंके मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. गेवराई मतदार संघात भाजपच्या लक्ष्मण पवारांनी दोन्ही पंडीतांशी लढत घेत मोठी आघाडी घेतली आहे. सर्वात आश्चर्यकारक निकाल येतोय तो आष्टीचा. लोकसभेत भाजपच्या प्रीतम मुंडेंनी ६५ हजार पेक्षाही अधिक मताधिक्क्य देणारा आष्टी मतदारसंघ यावेळी राष्ट्रवादीच्या पाठीशी दिसत आहे. इथून भाजपचे विद्यमान आ. भीमराव धोंडे यांना मोठ्या फरकाने पीछाडीवर टाकून राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे पुढे आहेत.

बीड मध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यात अटीतटीची लढत सुरू आहे. प्रत्येक फेरीनंतर पारडे कधी या बाजूने तर कधी दुसऱ्या बाजूने झुकत असल्याने शेवटच्या फेरीपर्यंत बीडच्या निकालाची उत्सुकता कायम राहणार आहे.