जालना : लोकसभा निवडणुकांनंतर आपण मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केलेल्या उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली-सराटी गावात ते उपोषणाला बसले असून पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारला आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला पाठिंबा न देणाऱ्या आमदारांना थेट इशारा दिलाय. तसेच, आंदोलनास होत असलेल्या विरोधावर आणि जातीवादी म्हणून टीका करणाऱ्यांवरही त्यांनी भाष्य केलं. जालना-अंबड आंदोलन झालं याठिकाणी आंदोलनासाठी कोणी परवानगी मागितली की, सरकार परवानगी नाकारत आहे, पण संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत आपण आंदोलन करणारच, असे जरांगे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, त्यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे.
अंतरवाली सराटी गावात 900-950 लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा देणाऱ्या सह्या दिल्या आहेत. गावातील लोकांचा निवेदनाचा विरोध संपला असल्याचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तसेच, काही विरोध हा होतच असतो, यापूर्वी सर्वांनाच विरोध झालाय छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप यांनाही विरोध झालाय. आम्ही आंदोलन सुरू केले तेव्हा ओबीसींनी सहभाग घेत आंदोलन केले तो विरोध झालाच, विरोध हा होतच असतो. मात्र, माझे इमान समाजाशी आहे, अशा शब्दात जरांगे यांनी आपली भूमिका मांडली.
उपोषणात कोणकोणते आमदार पाठिंबा देतात किंवां देत नाहीत, यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सर्व आमदारांनी त्यांच्या नेत्यांकडे जाऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करावी. आमच्या उपोषणाला कोण कोण पाठिंबा देत नाही, त्या सर्व आमदारांवर आमचं लक्ष आहे. त्यामुळे, अशा आमदारांना गरीब मराठे कायमचं घरी पाठवणार आहेत, असे जरांगे पाटील यांनी म्हटले
लाठीचार्ज जातीय द्वेषातूनच केला
कुठे जातिवाद केला? आम्हाला मारणारे पोलीस कोण आहेत त्यांच्या पाट्या शोधा, जाती द्वेषातून पोलिसांनी आणि सरकारने मारलं. पोलिसांनी जातीय द्वेषातून आणि सरकारच्याही द्वेषातून आम्हाला मारायला लावलं, मग जातिवाद कोणी केला? असा प्रति सवालच मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर जातीवादाचा आरोप करणाऱ्यांना विचारला आहे. तसेच, आमचे ठरलेले आरक्षण द्या नाहीतर आमचा नाईलाज आहे, असा इशाराही सरकारला दिला.
मोदींना गरिबांची गरज उरली नाही
पंतप्रधान गरिबांचं ऐकत नाहीत, त्यांना गरिबांची गरज नाही, केवळ सत्तेपुरती त्यांना गरज होती, आता सत्ता हस्तगत केली असून त्यांना गरज उरली नाही. त्यामुळे, मोदींना अवाहन करून उपयोगच नाही, ते गोर-गोरगरिबांच्या असते तर त्यांना आवाहन केलं होतं
आमदार शिरसाट यांचा फोन
आम्ही शिर्डीला असताना सरकारच्या वतीने उपोषणाच्या दोन-तीन दिवस अगोदर आमदार संजय शिरसाठ यांचा फोन आला होता, त्यानंतर त्यांचा फोन आला नाही अशी माहिती जरांगे यांनी दिली.