नवी मुंबई : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. असं असताना सरकारी वकीलांनी हा खटला सोडण्याचा निर्णय घेतल्याने आरोपींना याचा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांना सरकारकडून या खटल्यासाठी ठरवून दिलेलं मानधन दिलं जात नाही. याबाबत वकील प्रदीप घरत यांनी सरकारकडे वारंवार याबाबत पत्रव्यवहार करुनही कोणताच निर्णय होत नसल्याने त्यांनी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटल्यातून माघार घेत असल्याचे पत्र गृहविभागाला दिलं आहे.


सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा फायदा आरोपींना होणार असल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी आरोपी अभय कुरुंदकर यांनी इतर साथीदारांच्या विरोधात ठोस पुरावे गोळा केले आहेत. यात तांत्रिक पुराव्यांचा समावेश जास्त आहे. याबाबत न्यायालयासमोर वकील प्रदीप घरत यांच्याकडून आरोपींविरोधात असलेले पुरावे योग्य आणि ठोस पणे मांडले जात असल्याने लवकरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आश्विनी बिद्रे यांच्या हत्येतील पाच आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकते. मात्र आता गृहविभागाच्या आडमुठेपणामुळे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणातून माघार घेतल्यास याचा परिणाम सुनावणींवर होणार आहे.


अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात सरकारच्या वतीने प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. तर पत्रकार जे डे हत्याकांडातील आरोपी छोटा राजनच्या शिक्षा सुनावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.


अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण काय आहे?


पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. पोलीस सुरुवातील या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबियांनी केलाा होता.


अश्विनी बिद्रे यांचा 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरिक्षक पदी नियुक्ती झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली याठिकाणी झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.


यानंतर अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलीस खात्याने पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.