पंढरपूर : आषाढी सोहळ्यासाठी आलेली दहाही पालखी सोहळे प्रदक्षिणा मार्गाच्या आतील बाजूस असताना संपूर्ण शहरात संचारबंदी सुरु असल्याने नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले असून संचारबंदीत शिथिलता देण्याची मागणी होऊ लागली आहे. काल आषाढी एकादशीचा सोहळा मर्यादित संख्येत संपन्न झाला. आज द्वादशीपासून आता पौर्णिमेपर्यंत या पालखी सोहळ्याचे धार्मिक कार्यक्रम आपापल्या मठात सुरु असतात. 


अशावेळी संपूर्ण शहरात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण बनले आहे. याच पद्धतीने व्यापाऱ्यांची दुकानेही बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत. ज्या भागात पालखी सोहळे थांबले आहेत केवळ तेवढ्याच भागात संचारबंदी लागू ठेवल्यास नागरिक आणि व्यापाऱ्यांना थोडातरी दिलासा मिळू शकणार आहे. 


दरम्यान आज मानाच्या पालखी सोहळ्यातील कौंडिण्यपूर येथून आलेल्या रुक्मिणी माता पालखी सोहळा आणि पारनेर येथून आलेल्या निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्याने मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. यावेळी रुक्मिणी माता पादुका आणि देवाची भेट घडवण्यात आली. यानंतर आलेल्या निळोबाराय आणि देवाची भेट झाल्यावर पालखी सोहळ्यातील मानकऱ्यांनी देवाचे दर्शन घेतले. 


मंदिर समितीच्या वतीने या दोन्ही पालखी सोहळ्यांना मानाचा श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. वारकरी संप्रदायात मूळ मानाच्या पालख्या अशी ओळख असलेल्या 7 पालखी सोहळे हे पौर्णिमेच्या दिवशी विठ्ठल मंदिरात येतात आणि त्यावेळी देव संत भेट झाल्यावर गोपाळकाला करून प्रस्थान ठेवत असतात. मात्र सरकारने मानाच्या पालख्यात वाढवलेल्या या पालखी सोहळ्याचा काला पंढरपूरमध्ये गोपाळपूर येथे होत नसल्याने त्या उद्या प्रस्थान ठेवणार आहेत. खरेतर या दोन पालख्यांचे प्रस्थान आजच होणार होते मात्र बुधवारी पंढरपूर न सोडण्याची वारकरी संप्रदायात परंपरा असल्याने या दोन पालखी सोहळ्याचे उद्या प्रस्थान होणार आहे.