मुंबई : लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. काल लोकसभेत सचिन वाझे आणि 100 कोटींच्या वसुलीच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खूप गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला कारागृहात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.


 शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीमध्ये धमकावलं. महाराष्ट्रात तू कशी फिरते ते बघतोच. तुलाही तुरुंगात डांबू, अशी धमकी अरविंद सावंत यांनी दिल्याचं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटंलं आहे.




खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. शिवाय, संसदीय कामकाज मंत्री यांनाही सावंतांनी दिलेल्या धमकी दिल्याचं राणा म्हणाल्यात. दरम्यान, शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी नवनीत राणा यांनी लावलेले धमकीचे आरोप फेटाळलेत. याउलट त्यांनी राणाच सर्वांना धमकावत असल्याचा पलटवार केला आहे. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची फेसबुकद्वारे टीका केली. 


नवनीत राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा. कारण तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे. 


संबंधित बातम्या :


खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी; शिवसेनेच्या लेटरहेडवरुन धमकी आल्याचा दावा