Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory Result : दोन राष्ट्रवादीच्याच आमदारांमध्ये कुस्ती लागल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. कारखान्यात सभासदांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या गडहिंग्लजमधील कुपेकर गटासह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, काँग्रेस, अप्पी पाटील यांच्या समविचारी आघाडीला कौल दिल्याची चिन्हे आहेत. 


दुपारपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 20 हून अधिक केंद्रात मुश्रीफ यांच्या आघाडीने 1100 हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. संस्था गटात मुश्रीफ यांच्या आघाडीच्या सोमनाथ अप्पी पाटील यांनी राजेश पाटील यांच्या काळभैरव आघाडीच्या शिवाजी खोत यांचा 162 मतांनी पराभव करत विजयाचे खाते खोलले. खोत यांना 37 मते मिळाली. गडहिंग्लज शहरातही राजेश पाटलांना मते मिळवण्यात पुरेसं यश आलेलं नाही, हे मतमोजणीतून स्पष्ट होत आहे. 


दरम्यान, गडहिंग्लज शहरातील गांधीनगरमधील पॅव्हेलियन हॉलमध्ये सकाळी आठपासून मतमोजणी सुरु झाली आहे. सायंकाळी 6 पर्यंत निकाल अपेक्षित आहे. 


या निवडणुकीत शाहू शेतकरी आघाडी व काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी थेट लढत होत आहे. 19 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत. पाच अपक्षही आहेत. केंद्रनिहाय मतमोजणीचे नियोजन करण्यात आले आहे. 33 टेबलवर ही प्रक्रिया चालेल. एका टेबलला एक पर्यवेक्षक व दोन सहायकांची नियुक्ती केली आहे. एका टेबलला एका केंद्राची मतपेटी दिली जाणार आहे. प्रत्येक 50 मतपत्रिकांचे गट्टे तयार करून मतांची मोजणी होणार आहे. त्यांची थेट मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे एकाचवेळी सर्व उत्पादक गट व राखीव गटांची मोजणी होणार आहे. अशाच पद्धतीने दुसरी फेरी होईल.