हिंगोली : चोरी आणि गुन्हेगारी समाज अशी ओळख असलेल्या पारधी समाजाच्या तरुणांना अॅपे रिक्षांचं वाटप करण्यात आलं. या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला.
मराठवाड्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला. शंभर टक्के अनुदान तत्वावर पारधी समाजातील तरुणांना अॅपे रिक्षा वाटपाचा कार्यक्रम खासदार राजीव सातव, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष टारफे यांच्या हस्ते पार पडला.
पारधी हा समाजातील वंचित घटक असून रोजगार निर्मितीद्वारे हा समाज गुन्हेगारी प्रवृतीपासून परावृत्त होऊन व्यवसायाकडे वळणार, अशी अपेक्षा विशाल राठोड यांनी व्यक्त केली.
पहिल्या टप्प्यात एकूण 36 अॅपे रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यापूर्वी आदिवासी प्रकल्प विभागाने पारधी समाजातील दहा तरुणांना किराणा दुकाने टाकून दिली होती. वंचित घटक असलेल्या पारधी समाजाला अशा प्रकारे मदत मिळाली तर हे तरुण समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार यात शंका नाही.