सोलापूर : सध्या जगभरात चर्चेत असलेल्या अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा (Antibody Cocktail Treatment) प्रयोग सोलापुरात यशस्वी पार पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रयोग करत कोविड रुग्णांना 24 तासात बरे केल्याचा दावा केला आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग असल्याचं बोललं जात आहे.
अँटीबॉडी कॉकटेल पद्धत नेमकी काय?
- कोरोनाच्या या संकटात आशेचा किरण ठरलेली उपचार पद्धती म्हणजे, अँटीबॉडी कॉकटेल पद्धत.
- या उपचार पद्धतीत कोरोना बाधित रुग्णांना दोन अँटीबॉडीज एकत्रित दिल्या जातात.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील ही थेरपी वापरण्यात आली होती.
- आता याच थेरपीचा प्रयोग सोलापुरातल्या बार्शीत यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
सोलापूर बार्शीतील डॉ. अंधारे यांनी त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील आधुनिक उपचार पद्धतीतील मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा अँटीबॉडी कॉकटेलचा वापर केला आहे. अवघ्या 24 तासांत रुग्णांमध्ये सकारत्मक परिणाम दिसून आल्याचं ते सांगतात. कोरोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या उपचार पद्धतीमधील सर्वात प्रभावी उपचार पद्धतीने 5 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी चार रुग्णांवर हे औषध अंत्यत प्रभावी ठरल्याचा दावा संजय अंधारे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे डायबिटीज, लठ्ठपणा, हायपर टेन्शन, अशा विविध आजारांसह गंभीर असलेल्या रुग्णांवर डॉ. अंधारे यांनी हा प्रयोग केला आहे. या पद्धतीत कसलेही स्टिरॉइड वापर वापरले जात नसल्यामुळे म्युकरमायकोसिस किंवा पोस्ट कोविडचा मोठा धोका टाळत असल्याचा दावा देखील डॉक्टरांचा आहे. अवघ्या 24 तासांत परिणाम करणाऱ्या या उपचार पद्धतीमुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतोय. बार्शीसारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारे पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. तसेच राज्यातीलही हा पहिलाच प्रयोग असल्याचं बोललं जात आहे. इंजेक्शनची किंमत ही 60 हजाराच्या आसपास जरी असली तरी त्रास कमी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळात आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दोन लाटांमध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना आल्यापासून त्यावर निश्चित असं कोणतंच औषध नाही. अशा या कठिण काळात मोनोक्लोनल अँटीबॉडीज ही पद्धती आशेचा किरण आहे. ही पद्धती कोरोनावरील उपचारासाठी संजवनी ठरावी इतकीच अपेक्षा सर्वच स्तरांतून केली जात आहे.