Ann Arbor Marathi Mandal : अमेरिकेतील मिशिगन राज्यात मराठी संस्कृतीचे अविरत जतन करणाऱ्या 'ॲन आर्बर मराठी मंडळाने' (A2MM) आपल्या यशस्वी आणि गौरवशाली प्रवासाचा वीस वर्षांचा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे. या सुवर्णमयी आणि ऐतिहासिक निमित्तानं संस्थेच्या वतीने 23 आणि 24 मे 2026 या शनिवार आणि रविवारी “इंद्रधनू” या दोन दिवसीय भव्य महोत्सवाचे (Indradhanu Festival) आयोजन करण्यात आलं होतं. वॉश्टेनॉ कम्युनिटी कॉलेजमधील (Washtenaw Community College) टाउन्स्ली ऑडिटोरियममध्ये संपन्न झालेल्या या महोत्सवात मनोरंजन, संस्कृती, अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती आणि मराठमोळी समुदायभावना यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला.

Continues below advertisement

A2MM 20 Years Journey : 'मंडळ नव्हे, कुटुंब' घोषवाक्य सार्थ

या मंडळाची सुरुवात सन 2006 मध्ये झाली होती. त्यावेळी ॲन आर्बर परिसरातल्या अवघ्या मोजक्या मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन लावलेले हे एक लहानसे रोपटे आज मिशिगनमधील सर्वात उत्साही आणि आघाडीची मराठी सांस्कृतिक संस्था म्हणून विस्तारलं आहे. मंडळानं नेहमीच “मंडळ नव्हे, कुटुंब!” हे आपलं ब्रीदवाक्य आणि घोषवाक्य सार्थ ठरवलं आहे. 

आयोजकांच्या मते, या 'इंद्रधनू'च्या सात रंगांत A2MM च्या गेल्या वीस वर्षांचे संपूर्ण सार दडलेलं होतं, ज्यामध्ये मराठी संस्कृतीचे जतन, निखळ मैत्री, नवोदित स्थानिक कलागुणांचे संवर्धन, समाजसेवा, भावी पिढीची जडणघडण, आदरातिथ्य आणि दोन पिढ्यांमधील नातेसंबंधांचा सेतू यांचा प्रामुख्याने समावेश होता.

Continues below advertisement

Indradhanu Event Schedule : दोन दिवस, अनेक रंग आणि कार्यक्रमांची रेलचेल

या दोन दिवसीय महोत्सवात प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांसाठी काहीतरी खास वैशिष्ट्य ठेवण्यात आलं होते. दोन दिवस चाललेल्या या भरगच्च कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे अतिशय विलोभनीय होतं;

A2MM Day 1 Events : शनिवारचे कार्यक्रम (पहिला दिवस)

पारंपरिक सुरुवात : महोत्सवाची अतिशय दिमाखदार सुरुवात महाराष्ट्राची शान असलेल्या लेझिम आणि ढोलताशाच्या गजरात भव्य दिंडीने झाली, त्यानंतर मुख्य उद्घाटन समारंभ पार पडला.

शिवकल्याण राजा (Shivkalyan Raja) : पहिल्या दिवसाचे प्रमुख आणि मुख्य आकर्षण असलेला हा कार्यक्रम 'रागाबीट्स' (Ragabeats) ग्रुपने सादर केला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य जीवनावर आधारित संगीत, नृत्य, नाट्य आणि कथाकथन यांचा हा एक अपूर्व आणि अंगावर रोमांच उभा करणारा संगम होता.

अंताक्षरी व 'मधल्यात' : दुपारच्या सत्रात मंडळातील रसिकांसाठी अतिशय लोकप्रिय अशी अंताक्षरी स्पर्धा रंगली. त्याचसोबत 21 ते 40 वयोगटातील तरुण-तरुणींसाठी 'मधल्यात' हा विशेष संवाद उपक्रम झाला; ज्यामध्ये विविध खेळ, गप्पा आणि नव्या मैत्रिणी जोडण्याची उत्तम संधी मिळाली.

सुगंध महाराष्ट्राचा व DJ पार्टी : संध्याकाळच्या सत्रात मराठी लोकपरंपरा आणि सिनेमाचा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला, ज्यामध्ये मंडळाच्या इतिहासातील पहिलीवहिली पारंपरिक 'मंगळागौर' रंगमंचावर हुबेहूब सादर झाली. पहिल्या दिवसाची सांगता एका दणदणीत व धम्माल DJ डान्स पार्टीने झाली.

A2MM Day 2 Events : रविवारचे कार्यक्रम (दुसरा दिवस)

नाट्यसंस्कृतीचा अविष्कार : रविवारी सकाळी 'भूमिका' ग्रुपने 'महाभारत, एक इंद्रधनू' ही खुसखुशीत विनोदी एकांकिका सादर केली, ज्यामध्ये 14 स्थानिक मराठी कलाकारांनी इतिहासाची विनोदी फोडणी रंगमंचावर दिली. त्यानंतर तुषार पवार लिखित व दिग्दर्शित 'एका विहिरीची गोष्ट' ही हास्य आणि भयकथा (Horror Comedy) यांची उत्तम सांगड घालणारी दर्जेदार नाटिका सादर झाली.

इंद्रधनू भावविश्वाचे : दुपारनंतरच्या सत्रात अजरामर अशा मराठी गीतांचा आणि सुमधुर संगीताचा प्रवास रसिकांना मनसोक्त अनुभवता आला.

Vinyl to Viral (ग्रँड फिनाले) : जुन्या ते अगदी आजच्या नव्या पिढीच्या गाजलेल्या संगीत आणि नृत्यांचा जबरदस्त धमाका उडवून देत या ग्रँड गाला नाईटने (Gala Night) दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सवाचा अत्यंत उत्साहात समारोप झाला.