Lumpy Skin Disease : राज्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) धोका वाढत आहे. त्यामुळं राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहे. दिवसेंदिवस हा धोका वाढत असल्याचे दिसत आहे. वाढत्या लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यातील जनावरांना वेगानं लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वर्धा (Wardha) आणि नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात  जनावरांचा बाजार भरवणे, शर्यती लावणं, जत्रा भरवणे आणि प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 
राज्यात जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळं जिल्ह्यात या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भरणारे गुरांचे बाजार वर्धा आणि नंदूरबार जिल्ह्यात बंद करण्यात आले आहेत. परराज्यातून जिल्ह्यात गुरे आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. गुरांना लम्पी त्वचारोग होऊन ते दगावण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे.


लम्पी स्कीनचा धोका वाढल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा
 
दरम्यान, नंदूरबार जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढू नये म्हणून प्रशासन सतर्क झालं आहे. नंदूरबार जिल्ह्याच्या शेजारील असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणावर लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे.  हा आजार जिल्ह्यात येऊ नये यासाठी बाजार समितीतील गुरांचा बाजार बंद करण्याच्या निर्णय पशुसंवर्धन विभागानं घेतला आहे. गुरांवर कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. लम्पी स्कीन आजाराची परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांनी तातडीनं पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.


राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव 


सध्या राज्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहेत. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून खबरदारीची पावलं उचलण्यात येत आहेत. राज्यातील जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच राज्यात आणि परराज्यात जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. तर पुढील आदेश येईपर्यंत जनावरांचे बाजार आणि जत्रा बंद ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: