मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव असताना त्या सभापतीपदाच्या खुर्चीवर कशा बसल्या असा प्रश्न विचारत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी त्यावर आक्षेप घेतला. एखाद्यावर अविश्वास ठरावा आणला गेला असताना त्या खुर्चीवर बसणे हे नैतिकतेला धरून आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला. याबाबत सभागृहाच्या सचिवालयाने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी परब यांनी केली. 

Continues below advertisement


विधानसपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर महाविकास आघाडीकडून अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. सभापती राम शिंदे यांच्याकडे बुधवारी तशा आशयाचे पत्रही देण्यात आले. त्यानंतर आज नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेत आल्या आणि त्यांनी कामकाजात सहभाग नोंदवला. सभापतींच्या गैरहजेरीत त्या सभापतींच्या खुर्चीत बसल्या. त्यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. 


अनिल परब म्हणाले? 


अनिल परब म्हणाले की, "आपल्या विरोधात अविश्वास ठराव आहे. नैतिकतेला धरून आपण या खुर्चीवर बसणार नाही असं आम्हाला वाटलं होत. कारण सकाळी सभागृहात आपण येऊन सभापती खुर्चीवर न बसता सभागृहात बसलात. कदाचित आपण नैतिकतेला धरून अविश्वास ठरावावर निर्णय होत नाही तोपर्यंत सभापतींच्या खुर्चीवर बसणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं. परंतु आता आपण खुर्चीवर बसला आहात. मला सचिवालयाला विचारायचं आहे की नेमके अविश्वास ठरावाबाबत काय नियम आहेत?


घटनापीठाच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला तर त्याला पदावर बसता येत नाही असं नियम असावा. यावर सचिवालयाने खुलासा करावा अशी मागणी अनिल परब यांनी केली. 


नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या? 


अनिल परबांना उत्तर देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. या आधीही अनेकांवर अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. त्यामुळे माझ्यावरच मी बोलणे योग्य नाही. तुम्ही जे विचारलं आहे त्यावर समाधानकारक उत्तर दिलं जाईल. गेल्या वेळीही माझ्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता. त्यावेळी अविश्वासदर्शक ठराव दाखल झाला तरी ती व्यक्ती दैनदिन कारभारात भाग घेऊ शकते असं आधीच्या वेळी सांगितलं होतं. 


नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वास ठराव


उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर नीलम गोऱ्हे या ठाकरे गटाच्या रडारवर आहेत. महाविकास आघाडीने आता त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. तशा आशयाचं पत्र विधानपरिषद सभापतींना देण्यात आलं आहे. 


नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरेंसोबत असताना विधानपरिषदेच्या सदस्या बनल्या. उद्धव ठाकरेंसोबत असतानाच त्यांना उपसभापतीपदी संधी मिळाली. 7 जुलै 2023 रोजी नीलम गोऱ्हे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेल्या. त्यानंतर ठाकरे गटाकडून गोऱ्हेंना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती. 


 



ही बातमी वाचा: