मुंबई : राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावाने डान्सबार सुरू असून त्यांनी अवैध वाळूचा उपसाही केला आहे. या संदर्भात आपण जे जे आरोप केले होते त्याचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचं ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितलं. गृहराज्यमंत्र्यांमुळे राज्याची आणि सरकारची प्रतिमा डागाळली जात असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. हे सर्व पुरावे तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.


ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी योगेश कदम यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे दिले. या पुराव्याच्या आधारे योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.


सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले


अनिल परब म्हणाले की, "विधीमंडळाच्या पावसाळी सत्राच्या अखेरच्या दिवशी मी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालू असलेल्या डान्सबारच्या संदर्भातला विषय उपस्थित केला होता. हा डान्सबार गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या नावाने चालू आहे आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा त्यामुळे अतिशय डागाळली जात आहे. मी जे आरोप केले ते सर्व पुरावे दिले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरावे तपासावेत आणि गृहराज्यमंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे."


या आधी डान्सबारवर पोलिसांची छापेमारी


अनिल परब पुढे म्हणाले की, "गृहराज्यमंत्र्यांवर डान्सबार आणि अवैध वाळू उपसा प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांसंदर्भात पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले. गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावाने डान्सबार सुरू आहे. 2023 साली 10 ऑगस्ट आणि 28 मे रोजी तसेच 2025 मध्ये 31 मे रोजी डान्सबारवर छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात 22 बारबाला, 22 गिराईक आणि रोकड रक्कम जप्त करण्यात आली होती. हे पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे लोक अशी त्यांची नोंद आहे. कायद्यानुसार, डान्सबारसंबंधी कोणत्याही गैरप्रकारांची जबाबदारी मूळ मालकावर येते. या सर्व पुराव्यांच्या आधारे गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आपण केली आहे."


अवैध वाळू उपसाचे पुरावे दिले


अनिल परब म्हणाले की, "अवैध वाळू उपसा करून ती खेडमधील योगिता डेंटल कॉलेजमध्ये डंप केली ठेवली आहे. अकित मुकादम नावाचा कार्यकर्ता वाळू उपसात सहभागी असल्याचा दावा करण्यात आला. परिवहन खात्याचा एक अधिकारी ई चलन मशिन वापरून वसुली करत असल्याचे व्हिडओ फुटेजही सादर करण्यात आले."


अनिल परब म्हणाले की, "वाळू उपसा संदर्भात उच्च न्यायालयाने कारवाईसाठी शो कॉज नोटीस देण्यास सांगितले आहे. अवैध उपसाला परवानगी दिलेली नाही. आपण उच्च न्यायालयाच्या निर्देशाची प्रत पुरावा म्हणून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुरावे तपासून निर्णय घ्यावा."