Anil Deshmukh on Dada Bhuse : राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अनेक बोगस तुकड्यांना मंजुरी दिली आहे. त्या आधारावर बॅक डेटमध्ये बोगस शिक्षक भरती केल्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने मोठा आरोप केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे.
शिक्षक भरती घोटाळा राज्यात अनेक ठिकाणी
शिक्षक भरती घोटाळा फक्त नागपूर जिल्हा पुरता मर्यादित नसून राज्यात अनेक ठिकाणी हा घोटाळा झाला असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघातही हा घोटाळा झाला आहे. 2015 पासून नव्या तुकड्यांना मान्यता देण्यात येऊ नये असे असताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये बॅक डेटमध्ये तुकड्यांना मान्यता देऊन शंभर शिक्षकांची बॅक डेटमध्ये नेमणूक केली आहे. एक एक शिक्षक दोन शाळेत नोकरीवर दिसून येत आहे. अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात एवढा मोठा घोटाळा, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे
शिक्षण मंत्रांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस तुकड्यांना नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन बोगस शिक्षक भरती होत असेल, तर राज्यभरातील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे असे देशमुख म्हणाले. नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक घोटाळा संदर्भात एसआयटीची निर्मिती करण्यात आली असून ती एस आय टी सध्या चौकशी करत आहे. मात्र राज्यसाठीची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत करावी अशी मागणी आहे. शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात एवढा मोठा घोटाळा होत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असे देशमुख म्हणाले. बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे सरकारला विनंती करत आहोत पुढेही विनंती करू नाहीतर न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे असे देशमुख म्हणाले.
शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्रित येण्याबद्दल चर्चा नाही
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्बात देखील अनिल देशमुकांनी प्रतिक्रिया दिली. साखर संघामध्ये साखर संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची सभासदांची काल बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार, अजित पवार हे एकत्रित होते. अशा पद्धतीच्या बैठका साखर संघामध्ये होत असतात. तुम्ही जी शंका घेत आहेत असं काहीही नाही. आमच्या पक्षांमध्ये शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्रित येण्याबद्दल कुठलीही चर्चा नाही असे देशमुख म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर झाल्या पाहिजे. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहे, ते तर वाट पाहत आहेत सोबतच जनता ही वाट पाहत आहे. अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळे नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये अत्यंत वाईट स्थिती आहे. निवडून आलेले नगरसेवक लोकांचे प्रश्न सोडवू शकतात. नऊ नऊ वर्षांपासून लोकल बॉडीज मध्ये प्रशासक आहे. अधिकाऱ्यांच्या भरवशावर कारभार सुरू आहे. लवकर निवडणूक झाली पाहिजे ही जनतेची मागणी आहे असे देशमुख म्हणाले.
महायुती सत्तेत येऊन अनेक महिने झाले पण रायगड आणि नाशिकला पालकमंत्री नाही
महाविकास आघाडीवर घोटाळ्याचे आरोप करतात, मात्र, त्याचा पुरावा तर दिला पाहिजे. आम्ही बोगस शिक्षक भरती बद्दल आरोप करत असताना पुरावे देत आहोत असे देशमुख म्हणाले. महायुती सत्तेत येऊन अनेक महिने झाले. तरी दुर्दैवी बाब आहे की अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाही. रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्री झालेले नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये वाद सुरु आहे. जर सहा सहा महिने जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ शकत नसाल, तर ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे असे देशमुख म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतायेत, निर्णय लवकर घ्यावा
राज्य शासन अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीटमुळे होणाऱ्या नुकसानीचा निकष 3 हेक्टर वरून 2 हेक्टर करण्याच्या मनस्थितीत आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या पिकांना भाव नसताना असा निर्णय करणे अत्यंत चुकीची ठरेल. राज्य सरकारने या संदर्भात विचार करायला हवा असे देशमुख म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्य शासन एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस सातबारा कोरा करु असे म्हणायचे. अजित पवार 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरायला शेतकऱ्यांना सांगतात. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. राज्य सरकारने लवकर त्याबद्दल निर्णय घ्यावा असे देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
लवकरच शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय, मंत्री भुसेंची माहिती, वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा होणार