मुंबई : केंद्र सरकारचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री बनले असा दावा भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही फडणवीस मुख्यमंत्री का बनले असा सवाल आत्तापर्यंत उपस्थित करण्यात येत होता. त्यामागे कारण होते असा दावा हेगडेंनी केला आहे.


राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचे 40 हजार कोटी होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले असते तर त्यांनी 40 हजार कोटींचा दुरुपयोग केला असता, त्यामुळेच फडणवीस यांना 80 तासांचे मुख्यमंत्री व्हावं लागलं असा दावा हेगडेंनी केला आहे. 15 तासांत मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या फडणवीसांनी 40 हजार कोटी योग्य ठिकाणी पोहोचवले असा दावाही हेगडेंनी केलाय.

अनंतकुमार हेगडेच्या दाव्याचं देवेंद्र फडणवीस कार्यालयाकडून खंडन

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार अनंतकुमार हेगडेचा दावा फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री असतांना शेतकरी मदतीचा पाच हजार कोटी रुपयांच्या निर्णयाव्यतिरिक्त कोणताही निर्णय झालेला नाही. असे पैसे काही केंद्र थेट देत नसतं आणि असा पैसा राज्य सरकार परत पाठवू शकत नाही. व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड असलेल्या माहितीवर वक्तव्य करण्यापेक्षा पुराव्यानिशी बोलणं केव्हाही योग्य असल्याचं मतं देवेंद्र फडणवीस कार्यालयाने व्यक्त केलं आहे. अनंतकुमार हेगडेकडून करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचही स्पष्ट करण्यात आलं आहे.

अनंतकुमार हेगडे काय म्हणाले?

‘80 तासांचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. राज्याच्या राजकारणात हा सगळा ड्रामा का केला असा प्रश्न उपस्थित झाला होता. आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हतं का?, तरी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केंद्राच्या 40 हजार कोटींचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हे सगळं करण्यात आलं’ असा दावा भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. केंद्राचे हे सगळे 40 हजार कोटी रुपये विकासाच्या कामासाठी वापरले जाणार होते. यासाठीची योजना आधीपासून तयार होती. यासाठी हे सगळं करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच 15 तासांत 40 हजार कोटी केंद्राकडे पाठवण्यात आल्याचं हेगडेंनी सांगितलं.

Anant Hegde |...म्हणून देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री बनले : भाजप खासदार अनंत हेगडे | ABP Majha



असे झाले असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हाव लागेल : नवाब मलिक

खासदार अनंतकुमार हेगडेंच्या सांगण्यावरुन जर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठीचे 40 हजार कोटी रुपये परत पाठवले असल्यास जनता ते कधीचं सहन करणार नाही. असे झाले असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हाव लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. हा राज्यावरचा अन्याय असून ही आग देशभरात पसरेल आणि यावर कोणतही राज्य गप्प बसणार नाही असही नवाब मलिक म्हणाले.

अनंतकुमार हेगडे कोण आहेत?

  • 1996 पासून सहा वेळा खासदार

  • सध्या उत्तर कन्नड मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात

  • जनतादल सेक्युलरच्या उमेदवाराला तब्बल 4 लाख 79 हजार मतांनी हरवून विजयी

  • पहिल्या मोदी सरकारमध्ये दीड वर्ष राज्यमंत्री होते

  • मुस्लिमविरोधी भूमिकेसाठी आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत

  • ताजमहाल, राहुल गांधींबाबतच्या वक्तव्यावरुन वाद


दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी 26 नोव्हेंबरला सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमच्याकडे बहुमत नसल्याने राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देतं आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले. तसेचं  जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीचं ठरलं नव्हतं. शिवसेनेने आकडे बघून बार्गेनिंग सुरु केलं. जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले. महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता, असेही फडणवीस म्हणाले.

आम्ही भूमिका घेतली होती की घोडेबाजार करणार नाही, फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अख्खा घोड्याचा तबेला उभा केला असेही फडणवीस म्हणाले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असं कधीही ठरलं नव्हतं. न ठरलेल्या बाबींचा बाऊ केला, अनेक दिवस त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. महाविकासआघाडीचं तीन चाकं असलेलं सरकार चालणार नाही, असंही ते म्हणाले.