Anand Paranjape :  अंजलीताई दमानिया या पूर्वग्रहदूषित होऊन आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत असल्याची टीका  राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली. अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्या व्यक्तीने राजीनामा द्यावा किंवा नाही हा पूर्णपणे मुख्यमंत्री यांचा अधिकार असल्याचे परांजपे म्हणाले. दमानिया यांचे म्हणणे आहे की 24 तासात अजित पवार यांनी राजीनामा दिला नाही तर त्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात जातील. जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत त्या तिथेच थांबतील. पण त्यांनी अजित पवार यांना भेटावे, आम्ही त्यांची भेट घडवून आणू अस परांडपे म्हणाले.  

Continues below advertisement

मी वॅार्निंग देते हा शब्द प्रयोग त्यांनी केला त्याचा मी निषेध करतो. ज्यांना लोकांनी निवडून दिले त्या लोकांबद्दल असं बोलले जाते हे योग्य आहे का? असा सवाल देखील परांजपे यांनी केला. त्यांनी जे काही पुरावे दिले ते विकास खरगे यांच्या समिती पुढे द्या. आपणच पुरावे द्यायचे, आपणच आरोप करायचे,  निकालही त्यांनीच द्यायचे ही त्यांची पद्धत योग्य नसल्याचे परांजपे म्हणाले.  त्यांनी जे सांगितले आहे की त्यांची जर इच्छा असेल तर त्या अजित पवार यांना भेटू शकतात. ती आम्ही ती घडवून आणू. त्यांनी सगळे पुरावे एसआयटीकडे द्यावे असे परांजपे म्हणाले. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र न्यायव्यवस्था आणि मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास नाही का? मुख्यमंत्री यांनी लगेच एसआयटी स्थापन केली होती ज्याची चौकशी सुरू आहे असे परांजपे म्हणाले. 

दमानिया यांची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही

दमानिया यांची जी भाषा होती ती योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही शोभणारी नाही. त्यामुळे मी सुरूवातीला सांगितले की त्या पूर्वग्रह दुषित अशी आहे. खरंतर हे दुदैवी आहे की कोवीड काळात महाराष्ट्राची आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळली अशा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर सात्यत्यानो त्या आरोपांचा भोंगा घेऊन फिरत आहेत असे परांजपे म्हणाले. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाल्या होत्या दमानिया?

अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरुन तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा राजीनामा ताबडतोब घ्यावा. अजित पवार यांचा राजीनामा घेतला नाही तर मी सगळे पुरावे घेऊन दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना जाऊन भेटेन, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केले. पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमेडिया कंपनीने (Amedia company) पुण्यातील वादग्रस्त जमिनीवर डेटा सेंटर सुरु करायचे सांगून स्टॅम्प ड्युटी माफ करुन घेतली. शीतल तेजवानी यांच्याकडून आपण ही 40 एकर जमीन लीजवर घेत आहोत आणि त्याठिकाणी आपल्या डेटा प्रोसेसिंग व मायनिंग सेंटर करायचे आहे, असे सांगून फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. अमेडिया कंपनीकडून त्यासाठी एलवाय घेण्यात आला, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.