मुंबई: सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी अनघा लेले (Anagha Lele) यांच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' (Fractured Freedom) या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार सरकारने तडकाफडकी मागे घेतल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. लेखक प्रा. शरद बाविस्कर (Sharad Baviskar) यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार नाकारल्यानंतर आता लेखक आनंद करंदीकर (Anand Karandikar) यांनीही त्यांना देण्यात आलेला पुरस्कार नाकारला आहे. तसेच डॉ. प्रज्ञा दया पवार (Pradnya Daya Pawar) यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. हेरंब कुलकर्णी यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. 


कोबाड गांधी लिखित आणि अनघा लेले यांनी मराठीत अनुवादित केलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकास राज्य शासनाने दिलेला पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय जीआर काढून घेतला.  त्यानंतर पुरोगामी लेखकांकडून निषेधाचा सूर उमटतोय. लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्य सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.  त्याचबरोबर ' भुरा ' या कादंबरीचे लेखक शरद बाविस्कर यांनी राज्य सरकारने दिलेला पुरस्कार नाकारायच ठरवलंय.  तर आनंद करंदीकर यांनी त्यांच्या 'वैचारिक घुसळण'  या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार याच कारणास्तव नाकारायच ठरवलंय.  पुरस्कार वापसीचे हे लोन आता वाढत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


Anand Karandikar: आनंद करंदीकर यांनी पुरस्कार परत केला 


अनघा लेले यांच्या भाषांतराला दिलेला पुरस्कार महाराष्ट्र शासनाने रद्द केल्याच्या निषेधार्त लेखक आनंद करंदीकर यांनी त्यांच्या 'वैचारिक घुसळण' या पुस्तकाला मिळालेला 1,00,000 रुपयांचा पुरस्कार परत देत असल्याचं शासनाला कळवलं आहे. 


प्रा. शरद बाविस्कर यांनी पुरस्कार नाकारला 


लेखक प्रा. शरद बाविस्कर (Sharad Baviskar) यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. प्रा. बाविस्कर यांना 'भुरा'  (Bhura) या आत्मकथनास लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या भूमिकेवर टीका करत त्यांनी आपण हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं जाहीर केलं आहे. 


Pradnya Daya Pawar: डॉ. प्रज्ञा दया पवार यांचा राजीनामा 


डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा राजीनामा दिला आहे.  कोबाड गांधी लिखित आणि अनघा लेले यांनी मराठीत अनुवादित केलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ पवार यांनी राजीनामा दिला आहे.


डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी यासंबंधी एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, "यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत कोबाड गांधीलिखित आणि अनघा लेले अनुवादित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला घोषित झालेला अनुवादित श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार आपल्याकडून जी. आर. काढून रद्द करण्यात आला आहे. तसेच पुरस्कारासाठी पुस्तकाची शिफारस करणारी परीक्षण समितीदेखील आपण एकतर्फी बरखास्त केली आहे. यातून तज्ज्ञांच्या निवड समितीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाला आहे, अशी माझी धारणा आहे.याचा निषेध म्हणून मी माझा राजीनामा देत आहे."


हेरंब कुलकर्णी यांची नाराजी 


साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनीही झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंबंधी एक पत्र लिहिलं असून त्यात म्हणतात की, "आपण सर्व अधिकारी व परीक्षक सामूहिक जबाबदारी चे तत्त्व म्हणून एकत्रित काम करत असू तर एकाच्या निवडीचा अपमान हा सर्वांचाच अपमान आहे. याचा मी एक परीक्षक म्हणून निषेध करतो. अनघा लेले यांनी अनुवादीत केलेल्या या पुस्तकावर जर बंदी असती तर समजू शकलो असतो. पण तसे नसतानाही व त्या पुस्तकाला नाहीतर केवळ अनुवादाला पुरस्कार असताना अशी भूमिका घेणे अत्यंत चूक आहे. आपल्या या भूमिकेमुळे माझ्यासारखे अनेक लोक इथून पुढे परीक्षक होणे नाकारतील. माझ्या एका सहकाऱ्याचा अपमान हा आम्हा सर्व परीक्षकांच्या अपमान आहे. आमच्या निवडीच्या पाठीशी जर मंडळ उभे राहणार नसेल तर निवड समितीत काम करण्याविषयी पुन्हा विचारणा करू नये ही विनंती. आपण तातडीने त्या लेखिकेची  माफी मागून हा पुरस्कार पुन्हा बहाल करावा."