Uddhav Thackeray : मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या, महिनाभरात अहवाल द्या; उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Shiv Sena Mumbai Meeting : युती किंवा आघाडी होईल अथवा नाही होणार, पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार राहा असे निर्देश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख नेत्यांची बैठक (Shiv Sena Mumbai Meeting) घेतली. राज्यभरात स्थानिक पातळीवर युती, आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. जर युती, आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. महिन्याभरात हा अहवाल जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी द्यायचा आहे.
Shiv Sena MNS Alliance : मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक
मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. मात्र स्थानिक पातळीवर युती, आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या. स्थानिक पातळीवर कुठे आघाडी, युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल.
Maharashtra Elections : बोगस मतदार शोधण्याच्या सूचना
मतदार याद्यांचा अभ्यास करा, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले? कुठे वाढले? बोगस मतदार शोधा? गटप्रमुखांनी 40 लाख मतदार कसे वाढले हे तपासा, मतदार याद्यांच्या घोळाबाबत माहिती समोर आणा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या.
Mumbai BMC Election : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी रस्सीखेच
राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदेंमध्ये रस्सीखेच असल्याचं चित्र आहे. मनपात आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी उद्धवना राज महत्त्वाचे वाटतात. तर आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी शिंदेंना हवा ठाकरे ब्रँड. त्यामुळे दोघांमध्येही राज ठाकरे सोबत यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहे.
जे राज्याला हवंय ते करणारच, असं स्पष्ट करत उद्धव ठाकरेंनी वर्धापनदिनाच्या मेळाव्यात मनसेशी युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले. त्यावर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे युतीसाठी लाचार झाल्याची टीका केली. पण शिंदेंनीसुद्धा राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू केल्याचं समजतंय.
ठाकरे आणि शिंदेंमधला संघर्ष आमदार, खासदार, नगरसेवक, पक्ष, चिन्ह यानंतर आता महापालिकेच्या सत्तेसाठी राज ठाकरेंना आपल्या गोटात ओढण्यापर्यंत पोहोचला आहे. सध्याची अवस्था बघता मुंबई महापालिकेत आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हवे आहेत. तर ठाकरे आपल्यासोबत आहेत, हे दाखवत मराठी मतदारांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी शिंदेंनाही राज ठाकरे सोबत हवे आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे टाळी कुणाला देणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा:
- Bala Nandgaonkar: मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट; 'तो' जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!


















