पंढरपूर : महाराष्ट्रात भटकी करणारा समाज म्हणाले तर धनगर समाज डोळ्यासमोर येतो. निम्मे वर्ष मेंढ्या घेऊन गावोगावी भटकंती करणाऱ्या या समाजातील एखाद्या मेंढपाळाकडील मेंढ्याची किंमत किती असेल? जर कोणी सांगितले बडे लोकं, नेते मंडळी वापरत असलेल्या फॉर्च्युनरपेक्षा जास्त असेल तर आपण विश्वास कसा ठेवणार? पण असा एक मेंढा सध्या सांगोला तालुक्यात असून या 'सर्जा'च्या पिल्लाला देखील 10 लाख रुपये मोजले जात आहेत. सर्जासाठी जत भागातून 27 लाखांपासून 40 लाखापर्यंत बोली लावून झालीय मात्र 1 कोटी रुपये आले तरी सर्जाला विकणार नसल्याचे या मेंढ्याच्या मालकाने सांगितलंय.
सांगोला तालुक्यातील पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय असलेले बाबू मेटकरी यांच्याकडे असणारा हा सर्जा मेंढा महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंद केसरी म्हणून ओळखला जातोय. यामुळेच आज फॉर्च्युनर, BMW अशा महागड्या कारपेक्षा याची किंमत जास्त आहे.
मालकाच्या उंचीशी स्पर्धा करणारी उंची, अजस्त्र देहयष्टी आणि अतिशय देखणे रूप असलेला हा सर्जा माडग्याळ जातीचा 2 वर्षाचा नर आहे. सकाळ संध्याकाळ 1-1 लिटर दूध याशिवाय धान्य व शिवरीसह इतर मजबूत आहार असलेल्या या सर्जाचे नाक हे त्याचे मुख्य सौंदर्याचे लक्षण आहे. राघूच्या नकाप्रमाणे असणारे याचे नाक हे त्याचे सौंदर्य अधिकच खुलवत आहे. या माडग्याळ जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीला सर्वाधिक मागणी असते. महाराष्ट्रात दख्खनी व माडग्याळ या दोनच प्रमुख जाती आढळतात. माडग्याळ जातीच्या मेंढ्या प्रामुख्याने जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, माडग्याळ या भागात आढळतात.
या सर्जाच्या जन्मानंतर बाबू मेटकरी यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने त्यांना हा लकी वाटतोय. यातच त्याच्या या अनोख्या लूकमुळे मेंढ्यांसाठी या नराला खूपच मागणी येऊ लागली. अगदी चार दिवसांपूर्वी याच सर्जाच्या पिल्लाला तब्बल 10 लाख रुपये किंमत आल्याने याचा भाव चांगलाच वधारला आहे. सर्जासाठी जत भागातून 27 लाखांपासून 40 लाखापर्यंत बोली लावून झालीय मात्र 1 कोटी रुपये आले तरी सर्जाला विकणार नसल्याचे मेटकरी दाम्पत्य सांगतात. आपल्या पोटच्या पोराला हिंदकेसरी करण्यासाठी दूध, काजू बदामाचा खुराक देऊनही तो हिंदकेसरी बनला नाही. मात्र माझ्या सर्जा हिंदकेसरी ठरल्याचे बाबू गमतीने सांगतात.
सांगोल्यात फॉर्च्युनरपेक्षा महाग मेंढा, पिल्लालाच 10 लाखांची किंमत
सुनील दिवाण, एबीपी माझा
Updated at:
08 Jul 2020 11:13 AM (IST)
सांगोला तालुक्यातील मेटकरी यांच्याकडे असणारा सर्जा मेंढा महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंद केसरी म्हणून ओळखला जातोय.
त्याची किंमत आज फॉर्च्युनर , BMW अशा महागड्या कारपेक्षा जास्त आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -