Maharashtra : राज्यात एका बाजूला कोरोनाचा (Covid19) कहर ओसरला असला तरी दुसऱ्या बाजूला स्वाईन फ्लूने (Swine Flu) मात्र, लोकांची चिंता वाढवली आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमध्ये आढळून आले आहेत.


मुंबईत आठवडयाभरात स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या पाचपट, तर ठाण्यात तीन दिवसांत दुप्पट रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यभरात गेल्या सहा महिन्यांत 328 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. तर, 10 रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. 


मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांतच स्वाईनमुळे झालेल्या मृत्यूची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाने स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी कामाला सुरुवात केली आहे. स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे आरोग्य विभाग सरसावले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय.


कोरोना काळात 2020 आणि 2021 मध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव तुलनेने फार कमी होता. मुंबईत फ्लूचे 2020 मध्ये 44, तर 2021 मध्ये 64 रुग्ण आढळले होते. यावर्षी जुलैमध्येच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या पाचपट वाढून 66 वर गेली आहे. त्यामुळे येत्या काळात ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.


स्वाईन फ्लूची लक्षणे :



  • ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या जुलाब ही सर्वसाधारण स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. 

  • गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र होऊन आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो.

  • रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलटीतून रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 


अशी घ्या काळजी :



  • खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे.

  • हात वारंवार स्वच्छ करावे.

  • डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळावे.

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, लक्षणे आढळल्यास स्वत:हून औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.


कोरोनाचा कहर संपत आल्याने प्रशासनाने जम्बो कोविड सेंटर्सचा गाशा गुंडाळायला घेतला न घेतला तोच स्वाईन फ्लूच्या संकटाने पुन्हा आपल्याला अलर्ट मोडवर आणून उभं केलं आहे. त्यामुळे अखंड सावधानता आणि काळजी हाच महत्वाचा उपचार असणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :