Share Market : आपल्याला जे क्षेत्र यश मिळवून देतं, त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. बदलापुरात एका व्यावसायिकाने शेअर मार्केटमधून मिळालेलं यश आणि आर्थिक सुबत्तेनंतर कृतज्ञता म्हणून चक्क बंगल्याचं नावच 'शेअर मार्केटची कृपा' असं ठेवलं आहे. या अनोख्या बंगल्याची सध्या बदलापुरात मोठी चर्चा सुरू आहे. मुकुंद खानोरे असे या तरुण व्यावसायिकाचं नाव आहे.


आपण नवीन घर बांधल की त्या घरावर आईवडिलांची कृपा, एखाद्या देवाची कृपा असं नाव दिल्याचे पाहिले असेल. पण बदलापुरातील मुकुंद खानोरे या तरुण व्यावसायिकाने त्याच्या बंगल्याचं नाव चक्क 'शेअर मार्केटची कृपा' असं ठेवलय. मुकुंद खानोरे हे मूळचे बदलापूरला राहणारे रहिवासी असून कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली होती. त्यानंतर या क्षेत्रात जम बसवत त्यांनी यश मिळवलं आहे. आज खानोरे हे शेअर मार्केटच्या जोरावर कोट्यधीश बनले आहेत. नुकतीच त्यांनी बदलापूरजवळच्या कासगावमध्ये मोठी खुली जागा विकत घेतली. या जागेवर त्यांनी मोठी बंगला बांधला आहे.  त्या बंगल्याचे नाव त्यांनी 'शेअर मार्केटची कृपा' असं ठेवल आहे. 


बदलापूर कर्जत राज्य महामार्गावरून जाताना हा बंगला हमखास नजरेस पडतो. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या बंगल्याची सध्या या भागात मोठी चर्चा सुरू आहे. शेअर मार्केटमुळेच आपल्याला आर्थिक सुबत्ता आणि यश मिळालं असल्याची माहिती मुकुंद खानोरे यांनी दिलीय. शेअर मार्केटबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण हे नाव ठेवल्याचे खानोरे यांनी सांगितले. आपल्याला आयुष्यात ज्या गोष्टीमुळे यश मिळतं, त्या गोष्टीप्रती कृतज्ञता अनेक जण व्यक्त करत असतात. पण शेअर मार्केट बद्दलच्या या कृतज्ञतेची नागरिकांमध्ये चर्चा आहे.


महत्त्वाच्या बातम्या :