Amol Mitkari on Dhirendra Krishna Shastri: बाहेरच्या उपऱ्यानी महाराष्ट्रात यावं आणि छत्रपतींवर बोलावं ही एक नवीन चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे कुणाच्या झोळीत समर्पित करण्याइतपत बोलायची हिम्मत अशा मुर्खांमध्ये येते कुठून हा खरा प्रश्न असल्याचा थेट प्रहार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी धीरेंद्र शास्त्रींवर केला. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराज यांच्यावर अभद्र टिप्पणी केल्यानंतर धीरेंद्र शास्त्रींविरोधात सोशल मीडियात संतापाचा उद्रेक झाला आहे. बागेश्वर धामचा भोंदू बाबा धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून “वदवून घेतलेला” चुकीचा इतिहास महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गर्भित इशारा दिला.
खरात बाबासोबत खरंतर ट्रिटमेंटला पाठवायला हवे
अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, बागेश्वर धामचा भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून “वदवून घेतलेला” चुकीचा इतिहास महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही. या बाबाला खरात बाबासोबत खरंतर ट्रिटमेंटला पाठवायला हवे. बाहेरच्या उपऱ्यांनी महाराष्ट्रात यावं आणि छत्रपतींवर बोलावं ही एक नवीन चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे कुणाच्या झोळीत समर्पित करण्याइतपत बोलायची हिम्मत अशा मुर्खांमध्ये येते कुठून हा खरा प्रश्न आहे.. “तुका म्हणे ऐशा नरा l मोजुनी माराव्या पैंजारा ll”
काय म्हणाले आहेत धीरेंद्र शास्त्री?
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाहीय. तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा...तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाहीय. आता आम्हाला विश्राम हवा आहे. काही दिवस आम्हाला काहीच करायचे नाहीय. यावर हसत रामदास स्वामी म्हणाले की, ठीकंय...मी स्वीकार करतो. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की, तुम्ही माझे कोण आहात?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे. रामदास स्वामी म्हणाले, मी कोण आहे?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही आमचे गुरु आहात. मग रामदास स्वामींनी विचारलं, मग शिष्यचं कर्तव्य काय?, यावर शिवराय म्हणाले, जे गुरु आदेश देतील. यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातलं आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे, मी चालवणार...पण आज्ञा तुम्हाला आहे, तुम्हाला संचालन करायचं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
