Amol Mitkari on VSR Ventures : राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला. या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये सुरुवातीला विमान झाडावर आदळलं. त्यानंतर जमिनीवर कोसळल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या अहवालानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. (Ajit Pawar Plane Crash Report) यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. VSR चा मालक रोहित सिंहला अटक करा अशी मागणी मिटकरींनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी काल 'व्हीएसआर व्हेंचर्स'चे मालक रोहित सिंग यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ 'ट्वीट' केला होता. त्यामध्ये रोहित सिंग हा वैमानिकाच्या बाजूला झोपलेला दिसत आहे. असाच बेजबाबदारपणा अजितदादांच्या विमाना अपघातावेळी झाला होता का? असा सवाल जय पवारांनी केला आहे. जय पवारांच्या या शंकेचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही समर्थन केलं आहे. यासंदर्भात सरकारने 'व्हीएसआर व्हेंचर'चा मालक रोहित सिंगला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.  यासोबतच अधिक चौकशीसाठी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनाही सरकारने ताब्यात घ्यावं, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संपूर्ण लढ्यात राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते जय पवार यांच्या सोबत असल्याचच आमदार मिटकरी म्हणाले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारने रोहित सिंगला अटक न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लढा उभारतील, असेही आमदार अमोल मिटकरी म्हणालेत. 

जय पवार नेमकं काय म्हणाले?

माझ्या वडिलांना आपण गमावले. ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडीओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, असं जय पवार म्हणाले. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो की, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी…ही एका मुलाची आर्तहाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी...असं जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले. (Jay Pawar On Ajit Pawar Plane Crash)