Amol Mitkari on Captain Ashok Kharat : भोंदूबाबा असणारा कॅप्टन अशोक खरात याचा व्हीएसआर कंपनीशी काय संबंध आहे का? याची चौकशी सरकारने करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजित पवारांच्या बारामती आणि मुंबईतील घराबाहेर झालेल्या आघोरी पूजेचे कनेक्शन कॅप्टन अशोक खरातसोबत आहे का? याची देखील चौकशी व्हावी असे मिटकरी म्हणाले. आमदार अमोल मिटकरी
कॅप्टन खरात याचा 'व्हीएसआर कंपनी'च्या विमानासोबत फोटो केला ट्विट
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात संदर्भात एक खळबजनक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये आमदार मिटकरी यांनी कॅप्टन खरात याचा 'व्हीएसआर कंपनी'च्या विमानासोबत एक फोटो ट्विट केला आहे. कॅप्टन खरात याचे 'व्हीएसआर कंपनी'चा मालक व्ही. के. सिंग यांच्याशी काही संबंध आहे काय?, याचा तपास करण्याची मागणी केली आहे. यासोबतच अजित पवारांच्या बारामती आणि मुंबई येथील निवासस्थानाबाहेर केलेल्या आघोरी पूजेशी कॅप्टन खरात याचा संबंध आहे का?, याचा तपास घेण्याची मागणी केलीयै. कॅप्टन खरातसंदर्भात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या 'एसआयटी'ने या दृष्टीनेही तपास करावा, अशी विनंती आमदार मिटकरी यांनी सरकारकडे केली आहे. या तपासातून नक्कीच अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल महत्वाचे धागेद्वारे मिळतील, असा विश्वासही आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?
अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाणे येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आरोपी अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अशोक खरातला अटक करण्यासाठी वेगळाच डाव आखला होता. आरोपी राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला. चोराला पकडण्यासाठी पोलीस परिसरात झडती घेत असल्याचे सांगत पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला. याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी खरातच्या घराचीही तपासणी सुरू केली. दरम्यान, घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी क्षणार्धात कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या. या अनपेक्षित हालचालीमुळे आरोपीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.