Amol Mitkari : शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण (Shivsena) हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे. शिंदे गट बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray ) नावाची मागणी करुन चिन्हाची मागणी करत आहेत. मात्र आमचे त्यांना आव्हान आहे की, बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे गटाला लगावला आहे. ते बारामतीत (Baramati) बोलत होते.
जनसंघ, काँग्रेस, या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे. तेथे शिवसैनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतीक आहे. तसेच शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं आहे.
'अंधेरीची जागा मविआच जिंकेल'
अंधेरीच्या पोटनिवडणूकीची जागा महाविकास आघाडी जिंकेल. चिन्ह जरी गोठवलं असलं तरी शिवसैनिकांचे रक्त पेटवले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि मुंबई महापालिकेत सुद्धा भगवा फडकवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवतारेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे: अमोल मिटकरी
भावना गवळी, अडसूळ, प्रतापराव जाधव ही सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसले. शिवतारे यांचे आता वय वाढले. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शिवतारेंची लायकी काय हे अजित पवारांनी अनेकदा दाखवून दिली आहे. राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असा आरोप शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. यावर मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'मुळ मुद्द्यावरुन लक्ष हटवण्याचं काम सुरु आहे'
बारामती अॅग्रोवर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र आयुक्तांना दिले आहे. बारामती अॅग्रोचा भ्रष्ट कारभार नाही आहे. राम शिंदेंच्या मनात आकस आहे की त्यांच्या हातातील मतदारसंघ रोहित पवारांनी घेतला. त्यांना विधानपरिषदेत घेतले. त्यांना मंत्रिपद देऊन भाजप त्यांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. बारामती अॅग्रोच्या कितीही चौकशा लावल्या तरी अॅग्रोचा कारभार स्वच्छ आहे. अनिल परब यांचे रिसॉर्ट पडणार, असं किरीट सोमय्या म्हणत होते मात्र आता दिवाळी आली. बोलायचे आणि मूळ मुद्यावरुन लक्ष हटवायचे हेच शिंदे गट आणि भाजप करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
'अब्दुल सत्तार आणि शहाजी बापू हे शिंदे गटाचे वाचाळवीर'
अब्दुल सत्तार आणि शहाजी बापू हे शिंदे गटाचे वाचाळवीर आहेत. अब्दुल सत्तार यांनी शिंदेंच्या पीएला शिवीगाळ केली. सत्तेच्या आविर्भावात ते राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना महाराष्ट्र त्यांनी चांगल्या रीतीने सांभाळला. अजित पवारांच्या कामाची दखल कॅगने घेतली आहे. जर चुकून फडणवीस किंवा मुनगंटीवार त्यावेळी अर्थमंत्री असते तर त्यांनी महाराष्ट्र भिकेला लावला असता. अजित पवारांनी जे काम केलं आहे त्याचं कौतुक महाराष्ट्र करतो आहे. त्यामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्यांच्या पोटात दुखतं आहे, अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली आहे.