रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित ठेऊन हा कसला अट्टहास? मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? कोस्टल रोडवरील म्युझिकल रोड प्रयोगावरुन अमित ठाकरेंचा सवाल
कोस्टल रोडवर वाहनचालकांसाठी एक आगळावेगळा अनुभव देणारी संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. याच मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Amit Thackeray on Coastal Road : वाहतूक कोंडीविरहित वेगवान आणि सुखकर प्रवासाची साक्ष ठरलेल्या मुंबईतील धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड)(Coastal Road) वाहनचालकांसाठी एक आगळावेगळा अनुभव देणारी संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. या रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या संगीत मार्गावर (मेलोडी रोड) पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकू येणार आहे. कोस्टल रोडवर साकारण्यात आलेली संगीत रस्त्याची संकल्पना वाहनधारकांना आनंद देणारी आहे. हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित ही अभिनव संकल्पना यापुढेही राबविण्याचा मानस आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. आता याच मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना याबबात नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे?
मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल रोडवरचा 'म्युझिकल रोड'चा प्रयोग नक्कीच नवीन आहे. काहीतरी वेगळं आहे. तंत्रज्ञानाचा असा वापर केल्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन! पण मुंबईकरांना खरंच 'याची' गरज आहे का? ही मुंबईकरांची 'बेसिक' मागणी तरी होती का? रस्त्यांचे इतके महत्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टाहास? असा सवाल अमित राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केला आहे.
संगीत रस्त्याची संकल्पना वाहनधारकांना आनंद देणारी : मुख्यमंत्री
कोस्टल रोडवर साकारण्यात आलेली संगीत रस्त्याची संकल्पना वाहनधारकांना आनंद देणारी आहे. हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित ही अभिनव संकल्पना यापुढेही राबविण्याचा मानस आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तर, या संगीत मार्गाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. परंतु, यावरून आता मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत. आता अमित ठाकरे यांच्या प्रश्नावर भाजप नेते काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल 11 फेब्रुवारी रोजी दुपारी साडे बारा वाजता या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
























